बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरण आणि त्याला मिळणाऱ्या धमकी याच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाशी निगडित असलेला लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या प्रत्यापर्पणाची प्रक्रिया पोलिसांनी चालू केली आहे. सध्या अनमोल बिश्नोई हा अमेरिकेत आहे. त्यालाच भारतात आणण्यासाठी ही प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
अनमोल बिश्नोई अमेरिकेतच असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली असून त्यानुसार त्यांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. १६ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठीचा अर्ज न्यायालयासमोर सादर केला आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने अनमोल बिश्नोईवर १० लाखांचे बक्षीसदेखील जाहीर केले आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी सर्व मदत केल्याचाही आरोप अनमोल बिश्नोईवर आहे. अनमोल बिश्नोईविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती तपास संस्थेच्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावरच अमेरिकेतली तपास यंत्रणांकडून मुंबई पोलिसांना संपर्क साधण्यात आला होता.
पोलिसांना न्यायालयाने प्रत्यार्पणाची परवानगी दिली असून त्यासंदर्भातील आवश्यक ती कागदपत्रे केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात आली आहेत. आता गृहमंत्रालयाकडून अमेरिकेतली संबंधित यंत्रणांशी याबाबत संपर्क साधला जाईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
दिवाळीच्या रोषणाईला विरोध करणाऱ्या तळोजामधील इमारतीला नितेश राणेंनी दिली भेट
बलुचिस्तानमध्ये स्फोट; शाळकरी मुलांसह पाच जणांचा मृत्यू
‘अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, राऊत आणि पटोले शांत’
१८ हिंदुंवर देशद्रोहाचा गुन्हा !
अनमोल बिश्नोईवर आत्तापर्यंत १९ गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी त्याचा समावेश वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत केला आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण आणि सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यामागेही अनमोल बिश्नोईच असल्याचा संशय आहे.