क्रीडांगणात खिलाडुवृत्तीची आपण अपेक्षा करत असलो तरी काहीवेळा खेळाडू ती खिलाडुवृत्ती सोडून देतात. त्याचा प्रत्यय टोकियो ऑलिम्पिकमध्ये आला होता. पण शेवटी अखिलाडुवृत्ती दाखविणाऱ्या त्या खेळाडूला पश्चात्ताप झाला.
टोकियो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचा कुस्तीपटू रवी दहिया आणि कझाकिस्तानचा कुस्तीपटू नूरइस्लाम सनायेव हे आमने सामने आले होते. रवी दहियाने ५७ किलो वजनी गटात नूरइस्लाम याचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीच्या या सामन्यात नूरइस्लाम याने रवीच्या दंडाला चावा घेतला होता. त्याच्या या कृतीमुळे क्रीडा विश्वातून त्याच्यावर नाराजी व्यक्त करून टीका करण्यात आली होती. अखेर आपल्या चुकीच्या कृतीची जाणीव होऊन नूरइस्लामने रवीची माफी मागितली आहे.
उपांत्य फेरीतील नूरइस्लाम आणि रवी यांच्यातील लढत ही अत्यंत चुरशीची झाली होती. लढतीत नूरइस्लामकडे मोठी आघाडी होती. मात्र रवी याने अखेरच्या अर्ध्या मिनिटात नूरइस्लामला चीतपट केले आणि अंतिम फेरी गाठली. लढती दरम्यान रवी जेव्हा प्रतिस्पर्ध्याची पाठ टेकविण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी नूरइस्लाम रवीच्या दंडाला चावा घेत होता. असे असतानाही रवीने हा सामना जिंकला आणि लढतीनंतर रवीने पंचांना नूरइस्लाम याने चावा घेतल्याचे व्रण दाखवले.
हे ही वाचा:
भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र
चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?
श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले
रवीच्या दंडाला चावा घेतानाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले. नूरइस्लामच्या अखिलाडू वृत्तीचे दर्शन झाल्यामुळे क्रीडाप्रेमींनी त्याच्यावर टीका करून संताप व्यक्त केला. मात्र अखेर नूरइस्लामला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने ‘मित्रा मला माफ कर’ अशा शब्दात रवीची झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
कुस्तीच्या आखाड्यात भांडण आणि मारहाण या गोष्टी नवीन नाहीत. नूरइस्लामने घेतलेल्या चाव्याबद्द्ल मी विसरूनही गेलो होतो. मात्र त्याने चावा घेतलेली जागा अजूनही दुखत आहे. तरीही नूरइस्लामबद्दल माझ्या मनात राग नाही. असे रवी दहिया याने सांगितले.