जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत दरड कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने लेणी क्रमांक ७ समोर कोसळलेले दगड बाजूला काढले. या संपूर्ण घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसून आले. सुदैवाने दरड कोसळण्याची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अंजठा लेण्यांचा युनेस्को हेरिटेजमध्ये समावेश होत असला तरी, महाराष्ट्र सरकारचे हे दुर्लक्ष निश्चीतच आहे यात दुमत नाही.
अजिंठा लेणी डोंगराच्या मध्यभागी कोरलेली असून, पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरील मुरुम व मोठमोठे दगड ठिसूळ होऊन लहानमोठ्या दरडी थेट अजिंठालेणीत कोसळण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने अत्यंत तत्परतेने दगड बाजूला काढून पर्यटकांना अजिंठा लेणी बघण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला.
पुरातत्त्व विभागाकडून अशा घटनांबाबत नेहमीच कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याचे आढळून येते. ही बाब जागतिक वारसास्थळ असलेल्या लेणीच्या जतन,संरक्षण व संवर्धानाच्या दृष्टीने घातक ठरु शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजिंठा लेणी या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तसेच रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला हा पाऊस सुमारे तीन ते चार तास मुसळधार होता. या संततधार पावसामुळे अजिंठा लेणी डोंगर माथ्यावरील एक दरड ठिसूळ होऊन रात्री उशिरा अजिंठा लेणीत कोसळली. या दरडीतील काही दगड लेणी क्रमांक- ७ समोरील रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतर पुढील लेण्यांकडे जाणारा मार्गच बंद झाला.
हे ही वाचा:
परमबीर सिंग यांना चांदिवाल समितीने ठोठावला दंड
पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन
… म्हणून या खेळाडूने चक्क ऑलिम्पिक पदक काढले लिलावात
११ जून २०२० मध्ये दरड कोसळून लेणी क्रमांक २० व २१ या दोन लेण्यांना जोडणारा पुल तुटला होता. सुदैवाने त्यावेळी ही दरड रात्रीच्या वेळी कोसळल्याने व लॉकडाऊनमुळे लेणी बंद असल्याने जिवीतहानी झाली नव्हती. त्यानंतर आता पुन्हा मंगळवारच्या रात्रीच्या पावसात लेणी क्रमांक ७ समोर दरड कोसळण्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत ही कोणतीही जीवितहानी झाली नसलीतरी या घटनेवरुन अजिंठालेणीत दरडीत कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना रोखण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाला सतत अपयश येतांना दिसत आहे.