हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला ‘गुढीपाडवा’ हा सण साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो. याशिवाय हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांमध्ये ‘गुढीपाडवा’ हा सण एक उत्तम मुहूर्त आहे. यादिवशी नवीन वस्तू, नवीन खरेदी, नव्या कामाचा शुभारंभ, सोने खरेदी, अशा गोष्टी आपण करतो. आपल्या दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे म्हणतात. गुढीपाड्व्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या उत्सवाला प्रारंभ होतो. शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षांमध्ये एकदा गुढीपाडवा येतो पण, आठ एप्रिल २०१६ ला वर्षारंभी आणि वर्षाअखेरीस असे दोन गुढीपाडवा आले होते.
असे म्हणतात कि, या दिवशीच ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली होती. प्रभू श्रीराम याच दिवशी अयोध्येत परत आले होते. प्रभू श्रीरामाने १४ वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा पराभव करून परतले होते. असेही म्हंटले जाते शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला होता. याच शालिवाहन राजाच्या नावाने ‘शालिवाहन शक’ हि नवीन कालगणना शक चालू झाली.
आपल्याकडे शिव आणि शक्तीची पूजा करण्यात येते. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा देवींची म्हणजेच आदिशक्तीची पण पूजा करतो स्त्री म्हणजेच आदिशक्ती, आदिमाता पार्वती. पार्वती आणि श्री शंकर यांचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून त्याच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आणि तृतियेला लग्न झाले म्हणून पाडव्याच्या दिवशी पार्वतीची शक्तिरूपात पूजा करतात त्यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा एकदा प्रवेश केला त्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला. अशी परंपरा आहे. गुढीपाडवा ज्या दिवशी येतो तो जो वार असेल तो ग्रह त्या वर्षाचा अधिपती असतो.
हे ही वाचा:
फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न
संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक
नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये
यामध्ये साठ संवत्सराची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीमध्ये पाच संवत्सराचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सराची बारा युगे मानली गेली आहेत. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली आहे. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते. असे मानतात. या तिथीला युगादी तिथी असे सुद्धा म्हणतात. याच दिवशी आपण पंचांग श्रवण पण केले जाते.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश,त्वचारोग, बरे करणे, धान्यामधील कीड थांबवणे असे अनेक औषधी गुण कडुनिंबाच्या अंगी असल्याचे आयुर्वेदात सुद्धा म्हंटले आहे. शरीराला थंडावा देण्याचे काम कडुनिंबाची पाने करतात म्हणूनच ती वाटून खाणे, आंघोळीला घेणे, ती पाने वाटून खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे म्हणूनच चैत्र प्रतिपातदेला पाडव्याला कडुनिंबाचे अनन्य साधारण महत्व आहे.
गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!!