दर १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी देश-विदेशातून भाविक दाखल होत असताना शिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेचा नेता आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात व्यत्यय आणण्याची धमकी पन्नू याने दिली आहे.
हिंदुत्व विचारधारेला विरोध करण्यासाठी आणि संपवण्यासाठी एका व्हिडिओमध्ये पन्नू याने ‘प्रयागराज चलो’ असे म्हटले आहे. तसेच त्याने आपल्या समर्थकांना लखनऊ आणि प्रयागराज येथील विमानतळांवर खलिस्तानी आणि काश्मिरी झेंडे फडकवण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओचा समारोप करताना त्याने घोषित केले आहे की, महाकुंभ प्रयागराज २०२५ ही युद्धभूमी बनेल.
दहा दिवसांत महाकुंभ मेळाव्यावर निशाणा साधणारी पन्नूची ही दुसरी धमकी आहे. आधीच्या एका व्हिडिओमध्ये, त्याने मकर संक्रांती (१४ जानेवारी), मौनी अमावस्या (२९ जानेवारी), आणि बसंत पंचमी (३ फेब्रुवारी) या धार्मिक कार्यक्रमाच्या प्रमुख तारखांमध्ये व्यत्यय आणण्याची धमकी दिली होती. अखिल भारतीय आखाडा परिषदेने पन्नूच्या आधीच्या व्हिडिओचा तीव्र निषेध केला आहे.
हे ही वाचा..
HMPV व्हायरस; गोडसे म्हणतायत नो टेन्शन!
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी आरएसएसचा ‘हरित महाकुंभ’ उपक्रम
वाल्मिक कराडसोबत फोटो व्हायरल; एसआयटीमधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी
छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक
महाकुंभ नगरमधून बोलताना परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी पन्नूनच्या धमक्या फेटाळून लावल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, जर पन्नू नावाच्या व्यक्तीने आमच्या महाकुंभात प्रवेश करण्याचे धाडस केले तर त्याला मारहाण करून हाकलून दिले जाईल. आम्ही असे शेकडो लोक पाहिले आहेत. महंतांनी हिंदू आणि शीख यांच्यात एकतेवर भर दिला, असे प्रतिपादन केले की पन्नूनचे विभाजन करण्याचे प्रयत्न निराधार आहेत. इथे शीख आणि हिंदू एकत्र आहेत. पन्नूचे भडकवण्याचे प्रयत्न अनाठायी आहेत. शीख समुदायानेच आपली सनातन परंपरा जिवंत ठेवली आहे. त्यांनी सनातन धर्माचे रक्षण केले आहे, असंही ते पुढे म्हणाले. पीलीभीतमध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत खलिस्तानी झिंदाबाद फोर्सचे तीन अतिरेकी मारले गेल्यानंतर ही धमकी आली आहे.