खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा धमकी दिली असून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याने इशारा दिला आहे. पन्नू याने १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या विमानातून उड्डाण न करण्याची धमकी दिल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. विशेष म्हणजे हल्ली सातत्याने विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळत असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच पन्नू याने दिलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शीख फॉर जस्टिसचा प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या फ्लाइटमधून प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीही पन्नूने अशी धमकी दिली होती. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. २३ जून १९८५ रोजी एअर इंडियाच्या बोईंग विमानाचा स्फोट झाला. या घटनेचे धागेदोरे खलिस्तानी दहशतवाद्यांशी जोडले गेले होते.
नोव्हेंबर २०२३ मध्ये, पन्नू याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलले जाईल आणि १९ नोव्हेंबर रोजी बंद राहील असा दावा करणारा एक व्हिडीओ जारी केला होता. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे, धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) विविध गुन्ह्यांचा आरोप लावला आहे. यापूर्वीही डिसेंबरमध्ये पन्नूनने १३ डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. तर, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनाही त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हे ही वाचा :
हिजबुल्लाची पळापळ, डेप्युटी सेक्रेटरी कासेम लेबेनॉनमधून सटकला
गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू
नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील टेकडीवर उभा राहिला ‘अनधिकृत भव्य दर्गा’
भागलपूरच्या प्रसिद्ध शिवशक्ती मंदिरात तोडफोड, हिंदू समाजाकडून निदर्शने!
स्वतंत्र सार्वभौम शीख राज्याचा पुरस्कार करणाऱ्या शीख फॉर जस्टिस या गटाचे नेतृत्व करत असल्याने पन्नूनला जुलै २०२० पासून गृह मंत्रालयाने देशद्रोह आणि फुटीरतावादाच्या आरोपाखाली दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. याच्या एक वर्षापूर्वी, भारताने देशविरोधी आणि विध्वंसक कारवायांमुळे बेकायदेशीर संघटना म्हणून शीख फॉर जस्टिसवर बंदी घातली होती.