भारत आणि कॅनडा या देशांतील वाद अधिक ताणाला जात असून दोन्ही देशांमधील संबंध कडवट होत चालले आहेत. हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा कट भारताने रचला होता, असा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केला होता. त्यानंतर या दोन्ही देशांमधील वाद वाढला असून याचा परिणाम राजकीय पातळीवर दिसून येत आहे. दरम्यान दोन्ही देशांकडून एकमेकांच्या राजदूतांची, अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
कॅनडामधील ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू याचा भारतीयांना धमकी देणारा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने कॅनडामधील भारतीयांना कॅनडा सोडण्याचा फर्मान सुनावले आहे. खलिस्तान समर्थक संघटना ‘सिख फॉर जस्टिस (SFJ)’ ने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकी दिली आहे आणि त्यांना लवकरात लवकर देश सोडण्यास सांगितले आहे.
गुरपतवंत सिंह पन्नूने दोन व्हिडिओ जारी केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये त्याने हिंदूंचा देश भारत असून त्यांनी कॅनडा सोडून भारतात परतावे, असे म्हटले आहे. जे शीख खलिस्तानचे समर्थक आहेत तेच कॅनडात राहतील.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये पन्नूने २५ सप्टेंबरला व्हँकुव्हर, ओटावा आणि टोरंटो येथील भारतीय दूतावास बंद करण्याची धमकी दिली आहे. यासोबतच सिख फॉर जस्टिसने भारत मुर्दाबाद मोहीम सुरू करण्याबाबतही बोलले आहे.
हे ही वाचा:
कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता
कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन
अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !
३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडात मारले गेलेल्या हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येसाठी भारतीय दूतावासाचे अधिकारी संजय कुमार वर्मा यांना जबाबदार धरले असून, किल इंडिया मुव्हमेंट अंतर्गत पुन्हा एकदा सार्वमत घेण्यात येणार असल्याचे सांगितले.