रस्त्यांवर बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांवर आता नजर ठेवणे शक्य होणार आहे. धावत्या गाडीतील चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित (एआय) डिस्ट्रॅक्ट ड्रायविंग डिटेक्शन डिवाइस मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कार्यान्वित केले आहे. यामुळे रस्त्यावरील जीवघेणे अपघात टाळायला मदत होईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कमी झालेल्या प्रभावामुळे आणि निर्बंधांच्या शिथिलीकरणामुळे रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर सेव्ह लाईफ फाउंडेशन आणि महामार्ग पोलीस ऑस्ट्रेलियन बनावटीच्या डिव्हाइसच्या माध्यमातून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यातील सर्वात अधिक वापरला जाणारा महामार्ग मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरच ही यंत्रणा बसवली आहे.
डिस्ट्रॅक्ट ड्रायविंग डिटेक्शन डिवाइसमध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाच्या मदतीने धावत्या वाहनांमधील चालकांच्या हालचाली टिपता येतात. रात्रीच्या अंधारात सुस्पष्ट दृश्य दिसण्यासाठी नाईट व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी यांनी दिली आहे. ही यंत्रणा सुरू केल्यानंतर १४ जून ते ५ ऑगस्ट या कालावधीत ५, ४७५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा:
१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?
एल्गार परिषदप्रकरणी १५ जणांविरूद्ध आरोपपत्र
तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर
अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ
चालकाचे लक्ष विचलित झाल्यास किंवा चालकाला झोप आल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार असल्यामुळे रस्त्यांवरील होणारे अपघात रोखण्यासाठीही मदत होऊ शकते. वाहनाचा वेग अधिक असताना स्टेअरिंगवरील हात काढणे किंवा वाहन चालवत असताना मोबाईल वापरणे अशा चालकांवर या तंत्रज्ञानाच्या मदतीने कारवाई केली जात आहे.
मुंबई – पुणे महामार्गावर या नव्या तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर ही यंत्रणा बसवण्याचा विचार आहे, असे एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.