प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी त्यांना कर्करोग झाला असून ते केमोथेरपी घेत असल्याचे शुक्रवारी उघड केले. ‘मी अतिशय उत्तम असून दिवसेंदिवस अधिक सुदृढ होत आहे,’ असे त्यांनी या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
जानेवारी महिन्यात केट यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या कुठेच दिसल्या नव्हत्या. त्यांच्या अशा या गायब होण्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या व्हिडीओमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
‘मी शस्त्रक्रियेतून बरी होत असताना सर्व स्तरांतून मिळालेला पाठिंबा आणि तुम्ही दाखवलेला समजूतदारपणा यामुळे तुम्हा सर्वांचे मला वैयक्तिकरीत्या आभार मानायचे आहेत. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी या दोन महिन्यांचा काळ खूप कठीण गेला. परंतु माझ्याकडे एक उत्तम वैद्यकीय पथक आहे, ज्यांनी माझी खूप काळजी घेतली, ज्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे,’ असे केट या व्हिडिओ संदेशाच्या सुरुवातीला म्हणताना दिसत आहेत. पोटावर शस्त्रक्रिया केल्यावर कर्करोगाचे निदान झाले नव्हते, असेही केट यांनी नमूद केले आहे.
‘मात्र शस्त्रक्रियेनंतरच्या चाचण्यांमध्ये कर्करोग असल्याचे आढळून आले. त्यामुळे माझ्या वैद्यकीय पथकाने मला प्रतिबंधात्मक केमोथेरपीचा कोर्स करावा, असा सल्ला दिला आणि मी आता त्या उपचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे,’ असे केट यांनी स्पष्ट केले.
‘विलियम आणि मी, आम्ही दोघेही संपूर्ण कुटुंबाच्या हितासाठी जे काही योग्य आहे ते सर्व काही खासगीपणा जपून करत आहोत. जॉर्ज, शार्लोट आणि लुईस (त्यांची मुले) यांना सर्व काही त्यांच्यासाठी योग्य आहे, अशा प्रकारे समजावून सांगण्यासाठी आणि मी ठीक आहे याची खात्री देण्यासाठी आम्हाला वेळ लागला आहे,’ अशी कबुलीही त्यांनी दिली.
हे ही वाचा:
२० वर्षांपासून फरार असलेल्या गँगस्टर प्रसाद पुजारीचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण
पंतप्रधान मोदींकडून मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा मॉस्कोमध्ये हल्ला; १४० जणांचा मृत्यू
‘मी त्यांना सांगितल्याप्रमाणे मी बरी आहे आणि मला बरे होण्यास मदत करतील अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मी दररोज माझ्या मनाने, शरीराने आणि आत्म्याने सुदृढ होत आहे. माझ्या सोबत विल्यम असणे हा एक मोठा दिलासा आहे. तुमच्यापैकी अनेकांनी दाखवलेले प्रेम, पाठिंबा आणि दयाळूपणा हे आमच्यासाठी अनमोल आहेत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे समजेल की, एक कुटुंब या नात्याने, आम्हाला आता माझा उपचार पूर्ण करण्यापर्यंत थोडा वेळ, आणि खासगीपणा जपण्याची गरज आहे,’ असे केट म्हणाल्या.
केट मिडलटन नेमक्या कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नाही. राजघराण्यातूनही अद्याप याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही.