तुरुंगात कैद असलेला काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसेन मलिक यांना पाकिस्तानच्या काळजीवाहू मंत्रिमंडळात पंतप्रधानांचे विशेष सल्लागार बनवण्यात आले आहे. जिओटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांच्या मानवी हक्क आणि महिला सक्षमीकरणासाठी मुशाल हुसेन मलिक यांना विशेष सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मुशाल यांचा पती, जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) कमांडर यासिन मलिक सध्या दिल्लीत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर यासिन मलिक सध्या तिहार तुरुंगात आहे. या दोघांचा विवाह सन २००९मध्ये इस्लामाबादमध्ये झाला होता. त्यांच्या विवाहसोहळ्याला त्यावेळी पाकिस्तानचे काही प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
पाकिस्तानचे १८ सदस्यीय मंत्रिमंडळासह पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या अधिकृत निवासस्थानी शपथ घेतली. सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत देश चालवण्याची जबाबदारी या काळजीवाहू मंत्रिमंडळाकडे सोपवण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने नव्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांचे नव्याने सीमांकन करण्याचा निर्णय घेतल्याने सार्वत्रिक निवडणुकांना विलंब होणार आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १४ डिसेंबर रोजी सीमांकन पूर्ण केले जाईल. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत निवडणुका घेणे क्रमप्राप्त असते. मात्र सीमांकनामुळे निवडणूक घेण्यासाठी निर्धारित कालावधीच्या अधिक दिवस लागणार आहेत.
हे ही वाचा:
हिमाचलमधील भूस्खलनाला बेबंद बांधकामे कारणीभूत
कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरला अटक
बिपाशा बासूच्या मुलीला हनुमान चालीसाचे धडे!
आसाम सीमांकनाला राष्ट्रपतींची मान्यता
या हंगामी मंत्रिमंडळात १६ केंद्रीय मंत्री आणि तीन सल्लागार आहेत. माजी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांची परराष्ट्र मंत्रीपदी, सरफराज बुग्ती यांची अंतर्गत मंत्रीपदी तर शमशाद अख्तर यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अन्वर अली हैदर यांची संरक्षण मंत्री म्हणून आणि ज्येष्ठ पत्रकार मुर्तझा सोलंगी यांनी माहिती मंत्री म्हणून शपथ घेतली. तर, खलील जॉर्ज यांनी अल्पसंख्याक मंत्री, उद्योगपती गोहर इजाज यांनी उद्योग मंत्री, शैक्षणिक तज्ज्ञ डॉ. उमर सैफ यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून शपथ घेतली. कायदा मंत्री म्हणून अहमद इरफान अस्लम, तर प्रसिद्ध अभिनेते जमाल शाह यांची सांस्कृतिक मंत्री म्हणून आणि अनिक अहमद यांची धार्मिक व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.