खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यांनी या प्रकरणात भारतावर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील वाद विकोपाला गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीचं ट्रुडो हे जी- २० साठी भारत दौऱ्यावर आले होते. भारतात आल्यानंतर देखील ट्रुडो यांनी बराच गोंधळ घातला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
जी- २० परिषदेला आलेल्या जस्टिन ट्रुडो यांनी त्यांना नेमून दिलेल्या सूटमध्ये राहण्यास नकार दिला होता. शिवाय त्यांना दुसरा सूट मिळवण्यासाठी त्यांच्या सिक्युरिटी टीमनेही भारतीय अधिकाऱ्यांशी बराच वेळ वादही घातला होता. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
यंदाच्या वर्षीचे जी- २० च्या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे होते. या परिषदेच्या मुख्य बैठकीसाठी जगभरातील अनेक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतात दाखल झाले होते. या सर्वांच्या राहण्यासाठी आणि सुरक्षेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीतील मोठ्या हॉटेल्सच्या स्पेशल सूटमध्ये आरक्षण करण्यात आले होते.
हे ही वाचा:
मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !
भारत-कॅनडा वाद: पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर शशी थरूर यांची टीका
दहशतवादी घोषित करताच निज्जरला मिळाले होते नागरिकत्व
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, ४५४ विरुद्ध २ मतांनी झाले संमत
जस्टिन ट्रुडो यांच्यासाठी देखील दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये एक सूट बुक करण्यात आला होता. सिक्युरिटी प्रोटोकॉलप्रमाणे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, बुलेटप्रूफ काचा अशा गोष्टी बसवण्यात आल्या होत्या. मात्र, ट्रुडो यांच्या शिष्टमंडळाने या सूटऐवजी साध्या सूटमध्ये राहण्याची मागणी केली होती. यामुळे भारतातील सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. यावरून काही तास ट्रुडो यांचे शिष्टमंडळ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यानंतरही ट्रुडो यांचा विचार बदलला नाही. अखेर, त्यांना साध्या रुममध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली. माहितीनुसार, कॅनडाने साध्या रुमसोबतच नेमून दिलेल्या प्रेसिडेन्शिअल सूटचेही पैसे देण्याची तयारी दर्शवली होती.