दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान सध्या स्वतःचं दहशतवाद्यांचे लक्ष्य बनला आहे. एकीकडे बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांकडून पाकिस्तानला लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे स्फोट, गोळीबारासारख्या घटनांनीही पाकिस्तान हादरून गेला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलुच बंडखोरांनी जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. तर, रविवारी पाक लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले आणि या हल्ल्यात ९० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा बलुच बंडखोरांनी केला. तर, लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल याची शनिवारी रात्री पाकिस्तानात हत्या करण्यात आली. यानंतर आता पाकिस्तानमध्ये आणखी एक हाय प्रोफाइल हत्याकांड घडले आहे.
क्वेटामध्ये जमियत उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय) वरिष्ठ नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची माहिती आहे. क्वेटा विमानतळाजवळ नूरझाई यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नूरझाई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, गोळीबाराची घटना क्वेटामधील एअरपोर्ट रोडवर घडली. अज्ञात हल्लेखोरांनी जमियत उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय) वरिष्ठ नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर दुखापतींमुळे मुफ्ती यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. सुरक्षा दलांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे.
दरम्यान, भारताच्या जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर अबू कताल याची शनिवारी संध्याकाळी पंजाब प्रांतातील झेलम भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कताल हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये होता. काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तसेच मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो निकटवर्तीय होता.
हे ही वाचा:
शांतता राखण्याच्या प्रत्येक प्रयत्नात पाककडून विश्वासघात!
हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या; ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी कोल्हापुरात निघणार मोर्चा
देशासाठी धोकादायक असलेल्या नार्को दहशतवादाला आळा घालणे महत्त्वाचे
साडेचार महिने मी फक्त एकदाच जेवतो!
तर, रविवारी क्वेटाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला. यामध्ये सात सैनिक ठार झाले तर २१ जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, बलुच लिबरेशन आर्मीने ९० पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचा दावा केला आहे. यापूर्वी, ११ मार्च रोजी, क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसचे बलुच बंडखोरांनी अपहरण केले होते.