एस. जयशंकर म्हणाले, ‘भारताला स्वतःच्या नरेटिव्हची गरज’

इंडियाज स्ट्रॅटेजिक कल्चर: ऍड्रेसिंग ग्लोबल अँड रिजनल चॅलेंजेस’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली भावना

एस. जयशंकर म्हणाले, ‘भारताला स्वतःच्या नरेटिव्हची गरज’

‘पाश्चात्य विचारांच्या मापदंडांच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय संबंध पुन्हा परिभाषित करण्यासाठी भारताला स्वतःच्या स्वतंत्र दृष्टिकोनाची आवश्यकता आहे,’ असे ठाम प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुण्यात केले.

‘अर्थशास्त्र बदलले असेल आणि राजकारण बदलत असेल, परंतु जर या बदलांच्या बरोबरीने संस्कृती न बदलल्यास हे नेहमीच अपूर्ण राहतील. जोपर्यंत आपण आपला दृष्टिकोन त्यांच्यासमोर ठेवत नाही, तोपर्यंत ते आमच्याकडे कधीही आमच्या हिताच्या दृष्टीने पाहणार नाहीत,’ असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल या डीम्ड युनिव्हर्सिटीत आयोजित ‘इंडियाज स्ट्रॅटेजिक कल्चर: अॅड्रेसिंग ग्लोबल अँड रिजनल चॅलेंजेस’ या आंतरराष्ट्रीय संबंधावर आधारित परिषदेत ते बोलत होते.

‘जी २० परिषदेने जगाच्या आर्थिक पुनर्संतुलनाबद्दल भाष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत राजकीय समतोल साधला गेला आहे. परंतु हे केवळ कोण बोलत आहे, याबद्दल नाही, तर ते कशाबद्दल बोलत आहेत, ते कोणाच्या संज्ञा वापरत आहेत, कथा, रूपक आणि संकल्पना काय आहेत, यावर आधारित आहे,’ असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

जयशंकर यांनी अमेरिकेशी संवाद साधण्यासाठी चीनद्वारे वापरल्या जाणाऱ्या ‘थुसीडाइड ट्रॅप’चा दाखला दिला. ‘आम्ही अजूनही एका मुद्द्यावर मागे पडतो. मूलभूत दृष्टिकोन आणि चिंता याबाबत संवाद साधण्यासाठी आपण अजूनही पाश्चिमात्य मापदंडाचा वापर करतो. हीच या मापदंडाची ताकद आहे,’ असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!

कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!

अमेरिकेतील एफबीआयची स्पेशल एजंट आहे भारतीय वंशाची महिला!

व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार!

जयशंकर यांनी इतिहासाकडे नव्या दृष्टीने आणि खुल्या मनाने पाहण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, “जर आपण राजकारण बाजूला ठेऊन आपल्या जवळच्या भूतकाळाचे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पुनर्परीक्षण केले तर आपल्याला दिसेल की आपला इतिहास अधिक गुंतागुंतीचा आणि आपली विचारसरणी अधिक सूक्ष्म आहे.”

 

“आज भारताला स्वतःच्या दृष्टिकोनातून नवा मापदंड तयार करण्याची गरज आहे. जर आपल्याला ‘ग्लोबल साउथ’च्या आवाजांपैकी एक व्हायचे असेल, जर खऱ्या अर्थाने संतुलन राखायचे असेल, जर आपल्याला पुढील ५० वर्षांत विलक्षण असे जग पाहायचे असेल, तर केवळ अर्थशास्त्र, जागतिक तंत्रज्ञान आणि राजकारणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे नाही परंतु सांस्कृतिक इतिहास, परंपरा, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

Exit mobile version