बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा पाकिस्तानाविरुद्ध लढा सुरू आहे. याचं पार्श्वभूमीवर अनेकदा या भागात बलूच लिबरेशन आर्मीकडून हल्ले सुरू असतात. दरम्यान, मंगळवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी प्रवासी ट्रेनचे अपहरण केल्यानंतर, देशाच्या सुरक्षा दलांनी १६ अपहरणकर्त्यांना गोळ्या घालून ठार मारले आहे, तर १०४ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.
११ मार्च २०२५ रोजी नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील माच येथील दुर्गम डोंगराळ भागात ट्रेनवर हल्ला करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या सुरक्षा कारवाईनंतर सुमारे १०४ प्रवाशांची सुटका केल्यानंतर, माच रेल्वे स्थानकावर एक सैनिक सुटका केलेल्या रेल्वे प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करत आहे. मंगळवारी दुपारी नऊ बोग्यांमध्ये सुमारे ४०० प्रवाशांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेस क्वेट्टाहून पेशावरला जात असताना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीशी संबंधित सशस्त्र लोकांनी गुडालर आणि पिरू कुनरीच्या डोंगराळ प्रदेशाजवळील एका बोगद्यात तिला अडवले. दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना महिला आणि मुलांसह १०४ प्रवाशांची सुटका करण्यात यश आले, अशी माहिती समोर आली आहे
सर्व प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढेपर्यंत बचाव मोहीम सुरूच राहील, असे सांगण्यात आले आहे. काही ओलिस प्रवाशांना डोंगरात नेण्यात आल्याचे वृत्त आहे आणि सुरक्षा दल अंधारात त्यांचा पाठलाग करत आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये ५८ पुरुष, ३१ महिला आणि १५ मुले यांचा समावेश आहे. त्यांना दुसऱ्या ट्रेनने माच येथे पाठवण्यात आले आहे.
अंधारात पळून जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी दहशतवाद्यांनी आता लहान गट तयार केले आहेत, परंतु सुरक्षा दलांनी बोगद्याला वेढा घातला आहे आणि उर्वरित प्रवाशांनाही लवकरच वाचवले जाईल, अशी माहिती आहे. असे पीटीआय सूत्रांनी सांगितले. बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बीएलएने जाहीर केले की त्यांच्याकडे सध्या २१४ ओलिस आहेत आणि त्यांनी किमान ३० सुरक्षा कर्मचाऱ्यांना ठार मारले आहे, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप या आकडेवारीची पुष्टी केलेली नाही.
मंगळवारी, गुडालार आणि पिरू कुन्रीच्या डोंगराळ प्रदेशाजवळील एका बोगद्यातून जात असताना, जाफर एक्स्प्रेसवर बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी गोळीबार केला. यावेळी नऊ डब्यांच्या या गाडीत ४२५ प्रवासी होते. ट्रेनचे अपहरण करण्यापूर्वी, बंडखोरांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला, ज्यामुळे ती दुर्गम भागात थांबवावी लागली. वरिष्ठ पोलिस अधिकारी राणा दिलावर म्हणाले की, ट्रेन अजूनही घटनास्थळी असून सशस्त्र लोक प्रवाशांना ओलिस धरून आहेत. सुरक्षा मोहिमेसाठी हेलिकॉप्टर आणि अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
त्या योद्ध्याला नमन, जो शरण गेला नाही तर मृत्यू स्वीकारला!, विकी कौशलची मानवंदना
पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांना दिले महाकुंभाचे गंगाजल, मखाना आणि बनारसी साडी
काँग्रेसचे नवे टूलकिट? वक्फ विधेयक विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे रस्ते अडवा!
सार्वजनिक निधीच्या गैरवापराप्रकरणी केजरीवालांवर गुन्हा दाखल करा
दुसरीकडे, बलुच लिबरेशन आर्मीने लष्कराने अपहरण केलेल्या राजकीय कैदी, कार्यकर्ते आणि बेपत्ता व्यक्तींची ४८ तासांच्या आत सुटका करण्याची मागणी केली आहे. जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर लष्करी कर्मचाऱ्यांसह ओलिसांना फाशी देण्याची आणि ट्रेन पूर्णपणे नष्ट करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.