अनेक महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अलिबाबाचे संस्थापक सदस्य जॅक मा पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. बुधवारी एका ग्रामीण भागातील शिक्षकांशी लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाचा जॅक मा यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
ऑक्टोबर २०२० पासून जॅक मा आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील वैर समोर येत होते. अलीबाबा कंपनीच्या अँट ग्रुप या फायनान्स कंपनीचा आयपीओ काढण्याची चर्चा होती. अँटग्रुपने तसे घोषितही केले होते. परंतु आयपीओ काढण्याच्या आदल्या दिवशी चीन सरकारने यावर बंदी आणली आणि अँट ग्रुपला आयपीओ काढता आला नाही.
डिसेंबर महिन्यापासूनच जॅक मा यांची अनुपस्थिती सगळ्यांना जाणवत होती. इंटरनेटवर चर्चांना उधाण आलं होतं की जॅक मा यांना चीनच्या सरकारने गायब केले आहे का? शी जिनपिंग सूड घेत आहेत का? जॅक मा हे श्रीमंत असल्यामुळे चीनचा कम्युनिस्ट पक्ष हा त्यांना जगूच देणार नाही. अशा तर्हेची विधानं समाज माध्यमांमधून केली जात होती.
पण आज या व्हिडिओमधून जगासमोर आल्याने या सगळ्या चर्चा आणि शक्याशक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. या व्हिडिओमधून जॅक मा हे सुखारूप असल्याचे जरी सिद्ध होत असले तरी जॅक मा आणि शी जिनपिंग वादाचा शेवट डोळ्यासमोर असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या घडामोडींकडे पूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.