गाझा पट्टीतील रुग्णालयावर बॉम्ब हल्ला केल्यामुळे अरब देशांसह जगभरातून इस्रायलवर टीका होत आहे. मात्र आयडीएफ म्हणजे इस्रायल सुरक्षा दलाने हा आरोप फेटाळून लावला आहे. गाझा पट्टीतील दहशतवादी गटाने डागलेल्या क्षेपणास्त्राचा वेध चुकल्यामुळेच ते अल-अहली रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये घुसले, असा दावा इस्रायलने केला आहे. या दाव्याला दुजोरा देणारे व्हिडीओ आता समोर येत आहेत.
गाझा पट्टीतील रुग्णालयात झालेल्या हल्ल्यात शेकडो जण ठार झाल्याची माहिती हमासच्या आरोग्य प्रशासनाने दिली होती. आधी हा स्फोट अल-अहली बाप्टिस्ट रुग्णालयात झाला असावा, असे सांगितले जात होते. मात्र बुधवारी समोर आलेल्या व्हिडीओनुसार, हा स्फोट रुग्णालयाच्या पार्किंगच्या जागी झाला.
या हल्ल्याचा संपूर्ण अरब जगतातून निषेध झाला होता. जॉर्डन, तुर्की, इजिप्त, सौदी अरेबिया आणि अन्य देशांनी इस्रायलवर तीव्र टीका केली होती. मात्र या दरम्यान आमची लष्करी मोहीम या भागात सुरू नव्हतीच, असा दावा इस्रायलच्या सुरक्षा दलाने केला आहे.
हे ही वाचा:
दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच; सौम्या विश्वनाथन प्रकरणाने करून दिली आठवण
एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस
पुण्यातील ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर
गाझा पट्टीतील रूग्णालयावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
मंगळवारी या हल्ल्यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचा अभ्यास करून हा हल्ला गाझा पट्टीतील दहशतवाद्यांनीच केल्याचे इस्रायलच्या सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे. ‘आयडीएफच्या सुरक्षा यंत्रणेने तपास केला असता, या भागांतून गाझामधील दहशतवाद्यांनी काही क्षेपणास्त्रे डागली होती. त्यातल्याच एका क्षेपणास्त्राचा वेध चुकल्याने ते रुग्णालयाच्या पार्किंगच्या ठिकाणी पडले,’ असे इस्रायलच्या सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
गाझास्थित दहशतवादी संघटनांकडून दररोज हजारो क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. त्यातील सुमारे ४५० क्षेपणास्त्रे गाझा पट्टीतच पडतात आणि तेथील नागरिकांना याची झळ बसते, असा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. या दाव्याला दुजोरा देणारे अनेक व्हिडीओही समोर येत आहेत.