इस्रायलचे युद्धनियोजन मंत्री बेनी गँट्झ यांनी रविवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारमधील युद्धनियोजन मंत्रिमंडळातील पदाचा राजीनामा दिला. गाझामधील युद्ध चिघळत असताना पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर देशांतर्गत दबाव निर्माण करण्याचे हे पाऊल मानले जात आहे.
माजी जनरल आणि संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी मे महिन्यात गाझासाठी युद्धोत्तर योजनेची मागणी केली होती. मात्र ती पूर्ण होऊ न शकल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याने त्यांच्या सरकारला धक्का बसणार नसला तरी, पॅलेस्टिनी हमास अतिरेक्यांच्या विरुद्ध पुकारलेल्या गाझा युद्धाला आठ महिने झाल्यानंतर नेतन्याहू यांना हा पहिला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नेतान्याहू यांना आता त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या घटक पक्षांवर अधिक अवलंबून राहण्यास भाग पाडले जाऊ शकते. माजी लष्करप्रमुख आणि गँट्झ यांच्या पक्षाचे सदस्य गॅडी इसेनकोट यांनीही युद्ध मंत्रिमंडळातून त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या युद्ध मंत्रिमंडळात केवळ तीन सदस्य शिल्लक राहिले आहेत. युद्धाबाबतीतील सर्व महत्त्वाचे निर्णय युद्धनियोजन मंत्रिमंडळाकडून घेतले जातात.
‘नेतान्याहू आम्हाला खऱ्या विजयाकडे जाण्यापासून रोखत आहेत. म्हणूनच आम्ही आज जड अंतःकरणाने हे सरकार सोडत आहोत. मी नेतान्याहू यांना विनंती करतो. निवडणुकीची एक तारीख निश्चित करा. आमच्या लोकांचे तुकडे होऊ देऊ नका,’ असे आवाहन गँट्झ यांनी केले. यावर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही काही मिनिटांतच उत्तर दिले: ‘बेनी, ही लढाई सोडण्याची वेळ नाही – ही वेळ आहे सैन्यात सामील होण्याची,’ असे भावनिक उद्गार काढले.
नेतन्याहू यांचे अतिउजव्या घटक पक्षांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गवीर आणि अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच या दोघांनीही गॅन्ट्झ यांच्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली. बेन ग्वीर म्हणाले की, त्यांनी नेतन्याहू यांना युद्ध मंत्रिमंडळात सामील होण्याची मागणी केली आहे.
स्मोट्रिच यांनी गँट्झ यांच्यावर टीका केली. ‘युद्धाच्या वेळी सरकारचा राजीनामा देण्यापेक्षा कुठलीही देशहितविरोधी कृती असू शकत नाही. हमासच्या ताब्यात असलेले ओलिस रोज मरणयातना भोगत आहेत,’ याचीही आठवण त्यांनी करून दिली. ओलिस आणि बेपत्ता कुटुंब मंच मोहिमेच्या गटानेही ओलिसांना सोडून देणाऱ्या नेत्यांना देश माफ करणार नाही, असे म्हटले आहे. मात्र ‘आम्ही कसोटीच्या क्षणी अयशस्वी झालो आहोत,’ असे सांगून गँट्झ यांनी ओलिसांच्या कुटुंबीयांची माफी मागितली.
हे ही वाचा:
भारताच्या गोलंदाजांची जादू चालली; शेवटच्या दोन षटकांत फिरला सामना
जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला; नऊ जणांचा मृत्यू
शनिवारी, इस्रायली सैन्याने गाझामधून चार ओलिसांची सुटका केली. त्यानंतर काही तासांतच नेतान्याहू यांनी गँट्झ यांना राजीनामा न देण्याचे आवाहन केले होते.
ओलिसांच्या सुटकेला प्राधान्य
युद्ध मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी नेतान्याहूच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या या माजी लष्करप्रमुखांनी सर्व ओलिसांची सुटका करण्यासाठी आणि त्यास ‘प्राधान्य’ बनविण्यासाठी करार करण्याचे आवाहन वारंवार इस्रायलला केले होते. नोव्हेंबरमध्ये एक आठवडाभराच्या युद्धविरामात अनेक ओलिसांची सुटका झाली होती. मात्र त्यानंतर कोणताही करार करण्यास इस्रायल अपयशी ठरला असून गाझामध्ये इस्रायलने भयंकर लष्करी मोहीम तशीच सुरू ठेवली आहे.