इस्रायलकडून युद्धात अतिरेक्यांना ठार करण्यासाठी ‘एआय’चा वापर?

‘९७२ मॅगेझिन’च्या अहवालात खुलासा

इस्रायलकडून युद्धात अतिरेक्यांना ठार करण्यासाठी ‘एआय’चा वापर?

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू असून यात हजारो नागरिकांचा बळी गेला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. अशातच आता या युद्धादरम्यान, इस्रायली लष्कराने हजारो मानवी लक्ष्यांच्या यादी तयार करण्यासाठी एका नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा (एआय) वापर केल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायली लष्कराने हवाई हल्ल्यांच्या नियोजनासाठी या यादीचा वापर केला असे ‘९७२ मॅगेझिन’ या ना-नफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या नियतकालिकात नमूद करण्यात आले आहे.

‘९७२ मॅगेझिन’कडून या वृत्तासाठी इस्रायलच्या गुप्तचर संस्थांमधील सहा निनावी सूत्रांची मुलाखत घेण्यात आली आहे. सूत्रांनी असा दावा केला की, संशयित अतिरेक्यांना त्यांच्या स्वत:च्या घरात लक्ष्य करून ठार करण्यासाठी ‘लव्हेंडर’ ही यंत्रणा इतर ‘एआय’ यंत्रणांबरोबर वापरण्यात आली. त्यामुळे या युद्धात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. ‘९७२ मॅगेझिन’ हे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या पत्रकारांद्वारे चालवले जाते.

हे ही वाचा:

डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’

वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

वानखेडेवर कोहलीचे ‘विराट’ मन

शाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप…

‘गार्डियन’ वर्तमानपत्रामध्येही यासंदर्भात वृत्त आले आहे. ‘९७२’च्याच सूत्रांच्या आधारे ‘गार्डियन’ या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या अन्य एका वृत्तामध्ये, एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, या यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात हल्ले करणे सोपे झाले, कारण यंत्राने हे काम थंडपणे केले. या वृत्तांमधून असे दिसते की, मर्यादित अचूकता आणि थोडीही मानवी नजरचूक यामुळे ‘एआय’च्या आधारे करण्यात येणाऱ्या युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी बळी पडण्याचा धोका आहे. मात्र, इस्रायलच्या संरक्षण दलाने या वृत्तांमधील अनेक दावे फेटाळले आहेत. ‘गार्डियन’ला दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘‘इस्रायली सैन्य दहशतवादी कारवायांचा वेध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करत नाही.’’

Exit mobile version