गाझामध्ये इस्रायलकडून सतत हल्ले केले जात आहेत. इस्रायलने स्पष्ट केले आहे की गाझामधील हल्ले थांबणार नाहीत. दरम्यान, उत्तर गाझा पट्टीत इस्रायली सैन्याने केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यात हमासच्या प्रवक्त्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गेल्या आठवड्यात हमाससोबतचा युद्धविराम करार मोडला आणि गाझावर हवाई हल्ले सुरू केले, ज्यामध्ये आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
या प्रदेशाच्या आरोग्य मंत्रालय आणि हमासच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि वेगवेगळ्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील सहा सदस्य आणि हमासच्या प्रवक्त्याचा मृत्यू झाला. जर हमासने ओलिसांना सोडले नाही, शस्त्रे टाकली नाहीत आणि प्रदेश सोडला नाही तर ते हल्ले तीव्र होतील, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गुरुवारी इस्रायलमध्ये सरकारविरोधात निदर्शक रस्त्यावर उतरले. तेल अवीवमधील एका चौकात निदर्शक जमले होते आणि त्यांनी गाझामधील युद्ध थांबवावे आणि नवीन निवडणुकांची मागणी करणारे पोस्टर हातात घेतले होते.
हे ही वाचा :
उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ?
पूरन-मार्शच्या स्फोटक खेळीने लखनौला ‘हैदराबादी तडखा’
भारत ही काही धर्मशाळा नाही…देशांतर-विदेशी नागरीक विधेयक संमत
महायुतीतील कोणता नेता वक्फ बोर्डावर प्रसन्न ?
यापूर्वी, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की इस्रायल-हमास युद्धात ५०,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि १,१३,००० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १५,६१३ मुलांचा समावेश होता, त्यापैकी ८७२ मुले एक वर्षापेक्षा कमी वयाची होती.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाले, जेव्हा हमासच्या सैनिकांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये १,२०० लोक मारले गेले आणि २५० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले गेले. याला प्रत्युत्तर म्हणून, इस्रायल लष्करी कारवाई करत आहे जी सतत सुरू आहे.