प्रजासत्ताक दिनाची औपचारिक सांगता शुक्रवार, दिनांक २९ जानेवारी रोजी ‘बिटींग रिट्रीट’ने होत असतानाच, त्या स्थानापासून केवळ दीड किलोमीटर दूर असलेल्या ‘डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम मार्गा’वरच्या इस्रायली दूतावासासमोर कमी ताकदीचा बॉम्बस्फोट झाला. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या बॉम्बस्फोटाशी इराणचा काही संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहता दिल्ली पोलिसांकडून याचा तपास लवकर ‘राष्ट्रीय तपास संस्था’ आपल्या ताब्यात घेण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यासोबत इस्रायली तपासपथक देखील या कामात सामिल होईल. शुक्रवारी घटनास्थळी भेट दिलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने घटनास्थाळाच्या मॅपिंगचे काम पूर्ण केले आहे.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार या कमी ताकदीच्या बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेले साहित्य स्थानिक पातळीवरुन मिळवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटासाठी ‘अमोनियम नायट्रेट’ वापरण्यात आले असण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दिल्ली पोलिस सातत्याने विविध केंद्रीय संस्थांशी यासंदर्भात संपर्कात आहेत. पोलिसांनी ‘केंद्रीय अन्वेषण विभाग’ आणि ‘इमिग्रेशन डिपार्टमेंट’सोबत संपर्क करून मागील महिन्याभरात भारतात आलेल्या इराणी नागरिकांची माहिती मिळवायला प्रारंभ केला आहे. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीमुळे या घटनेशी इराणचा काही संबंध असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या चिठ्ठीत “ही तर नुसती सुरूवात आहे. भारतातील विविध इस्रायली स्थळे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे” असे लिहीले होते. त्यामुळे देशभरातील इस्रायलशी संबंध असलेल्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुरक्षेतील वाढ
‘जैश-उल-हिंद’ या संघटनेने इस्रायली दूतावासासमोरील बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे. याबाबत दिल्ली पोलिसांचे सायबर सेल ज्या टेलिग्राम अकाऊंटवर हा स्क्रिनशॉट व्हायरल झाला त्या टेलिग्राम अकाऊंटचा शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमधील मॅक्लोइडगंज आणि धरमकोट या भागातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या भागात इस्रायली नागरिकांची सर्वाधिक वस्ती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.