इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेले युद्ध संपण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. आता तर इस्रायलने गाझा पट्टीतील राफा भागातही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलाने सोमवारी हमासच्या दहशतवाद्यांनी राफा येथे ओलिस ठेवलेल्या दोन इस्रायली, अर्जेंटिनाच्या नागरिकांची सुटका केली. इस्रायलच्या सुरक्षा दलाने या बचाव मोहिमेचे चित्रिकरण मंगळवारी जाहीर केले.
इस्रायलच्या स्पेशल पोलिसांच्या पथकाने राफामधून ६० वर्षीय फर्नांडो सायमन मार्मन आणि ७० वर्षीय लुईस हेअर यांची सुटका केली. आतापर्यंत गाझा पट्टीतील राफा येथे इस्रायलच्या सुरक्षा दलाने हल्ला केला नव्हता. त्यामुळे गाझा पट्टीतील लाखो रहिवाशांनी इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यातून वाचण्यासाठी राफा या शहराचा आसरा घेतला होता. आता मात्र हमासचे दहशतवादी येथेही लपले असण्याची शक्यता व्यक्त करून इस्रायलने या शहरालाही लक्ष्य केले आहे.७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये युद्ध पुकारले होते. हमासने केलेल्या या हल्ल्यात सुमारे २५० जणांना ओलिस ठेवले होते.
हे ही वाचा:
शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज!
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू!
इंदूरमध्ये भिकाऱ्याने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख रुपये!
गेल्या चार महिन्यांपासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे २८ हजार २४० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून ६७ हजार ९८४ जखमी झाले असल्याची माहिती गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, इस्रायली लष्कराने केलेल्या दाव्यानुसार, आतापर्यंत ३१ ओलिसांचा मृत्यू झाला आहे.
या मोहिमेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी सोमवारच्या मोहिमेने इस्रायल लष्कर आक्रमकपणे हल्ला सुरूच ठेवणार असल्याचे दाखवून दिल्याचे स्पष्ट केले. राफावर हल्ला करू नये, असा आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असूनही नेतान्याहू यांनी त्याची अजिबातच फिकीर केलेली नाही. इस्रायलच्या संरक्षण दलाने राफामध्ये केलेल्या हल्ल्यात ७४ पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलव्याप्त वेस्ट बँकमधील पॅलिस्टिनी प्रशासनाची अधिकृत टीव्ही वाहिनी पॅलेस्टाइन टीव्हीने केला आहे.