इस्त्रायल आणि इराण- समर्थित हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष वाढत असून पुन्हा एकदा इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांना हवाई हल्ला करून लक्ष्य केले. इस्रायलने मध्य बेरूतच्या शेजारील भाग असलेल्या लेबनॉनमधील रास अल-नबा भागाला लक्ष्य केले. या हल्ल्यात किमान २२ लोक ठार झाले आणि ११७ जण जखमी झाले. लेबनॉनच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पूर्वसूचना न देता गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात बेरूतमधील मध्यभागी असलेल्या दोन निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आले. बेरूतमध्ये गुरुवारी इस्त्रायली हत्येच्या प्रयत्नातून एक वरिष्ठ हिजबुल्ला अधिकारी वाचला, अशी माहिती आहे. लक्ष्यित इमारतींपैकी एक अशा भागात आहे जिथे अनेक विस्थापित लोकांना आश्रय दिला आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात लष्करी मोहिमेचा विस्तार झाल्यापासून बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील दाहियाहच्या बाहेर हा तिसरा इस्रायली हल्ला आहे. यापूर्वीचे हल्ले २९ सप्टेंबर रोजी बेरूतच्या कोला आणि ३ ऑक्टोबर रोजी बाचौरा यांना लक्ष्य करण्यात आले होते.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, जवळपास एक मैल अंतरावर या हल्ल्याची तीव्रता जाणवून येत होती. निवासी इमारतीमधून धूर निघत होता. आपत्कालीन सेवेतील लोकांनी तातडीने ही अपार्टमेंट रिकामी करून लोकांना अंगणात जमण्यास सांगितले.
हे ही वाचा :
‘रतन टाटा यांना आयुष्यभर देशाचाच विचार’
रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना
इस्रायल गेल्या एक वर्षापासून हमासविरुद्ध लढत आहे. या युद्धादरम्यान इस्रायलला आता इतर अनेक आघाड्यांवरही लढावे लागत आहे. इस्रायल हमाससोबतच येमेनमधील हुथी आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाविरुद्ध युद्ध लढत आहे. त्याचवेळी त्याची इराणशीही थेट लढत आहे. इस्रायलने गेल्या वर्षभरात गाझामध्ये शेकडो हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही गाझामधील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.