अरब इस्रायल संबंधांची नवी सुरूवात

अरब इस्रायल संबंधांची नवी सुरूवात

रविवार २४ जानेवारी रोजी इस्रायलने आपला दुतावास संयुक्त अरब अमिरातीत स्थापन करणार असल्याचे जाहिर केले. गेल्याच वर्षी आखाती देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्तीने पार पडलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ही वकिलात तात्पुरत्या स्वरुपाच्या कार्यालयात थाटण्यात येणार आहे. कायमस्वरूपी कार्यालयाची जागा निश्चित झाल्यानंतर हे कार्यालय हलवण्यात येईल. इटन ना’एह हे माजी इस्रायली मुत्सद्दी या सर्व कामकाजाचे प्रमुख आहेत.

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी आश्केनाझी यांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या वकिलातीमुळे आधीपासूनच सुधारत असलेल्या इस्रायल- संयुक्त अरब अमिरातीच्या संबंधांना बळ मिळेल. सप्टेंबर महिन्यापासूनच उभय देशांतील संबंधांनी नवे वळण घेण्यास सुरुवात केली होती. दोन्ही देशांनी थेट विमानसेवेला प्रारंभ केला होता. त्याशिवाय अनेक व्यापारविषयक करारादेखील करण्यात आले होते. अनेक इस्रायली पर्यटकांनी संयुक्त अरब अमिरातीला भेट देखील दिली होती.

ट्रम्प प्रशासनाच्या मध्यस्तीत झालेल्या विविध करारांच्या अन्वये इस्रायलसोबत नवे संबंध प्रस्थापित करणारे संयुक्त अरब अमिराती हे पहिले अरबी राष्ट्र ठरले आहे.

इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आपला एक विभाग मोरोक्को येथे तर एक वकिलात दुबई येथे स्थापन करणार आहे. बहारिन येथे एक दुतावास मागिल काही आठवडे कार्यरत आहे.

Exit mobile version