इस्रायलने लेबनॉनमधील इराणसमर्थित दहशतवादी गट हिजबुल्ला विरोधात आघाडी उघडली असून सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी केली आहे. शिवाय हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह याचाही खात्मा केला. यानंतर इराणही पेटून उठला असून त्यांनी इस्रायलला याचा बदला घेणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली. मंगळवारी उशिरा रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. यानंतर मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे.
इराण आणि इस्रायल आता आमनेसामने आले असून मंगळवारी रात्री इराणने इस्रायलची राजधानी तेल अविववर हल्ला केला. इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलमध्ये आप्तकालीन सायरन वाजविण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले गेले आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी इराणला कठोर शब्दात इशारा दिला आहे. इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र डागून खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्यांनी आता परिणामांसाठी तयार राहावे, असे कडक उत्तर इस्रायलने दिले आहे.
"Iran made a big mistake tonight – and it will pay for it," tweets Israel Prime Minister Benjamin Netanyahu pic.twitter.com/91LnFXuCyg
— ANI (@ANI) October 1, 2024
इराणच्या हल्ल्यानंतर नेत्यानाहू यांनी म्हटले की, जो कुणी आमच्यावर हल्ला करेल, त्याला आम्ही हल्ल्याने उत्तर देऊ. तसेच इराणच्या हल्ल्याला आम्ही परतवून लावले आहे. या अपयशी हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल. हमास आणि हिजबुल्लाची जी अवस्था केली आहे, तीच इराणची केली जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
हिजबुल्ला- इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीयांसाठी ऍडवायजरी
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू
परळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे तीनही टप्पे पूर्ण, सरासरी ६५ टक्के मतदान!
मध्य आशियात सध्या तणावाचे वातावरण असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून या प्रदेशात युद्धग्रस्त वातावरण आहे. हमासचे कंबरडे मोडत असतानाचा इस्रायलने हमासला पाठींबा देणाऱ्या हिजबुल्लाविरोधातही आघाडी उघडली आणि नव्या संघर्षाला तोंड फुटले. इस्रायलने हिजबुल्लाचा लेबनॉनमधील प्रमुख हसन नसराल्लाह याचा खात्मा केला शिवाय हिजबुल्लाच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. यातूनच आता इराणनेही इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.