इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असतानाच इस्रायलच्या हवाईहल्ल्यात इराणचा उच्च लष्कर अधिकारी सिरियात मारला गेल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संतप्त झालेल्या इराणचे अधिकारी आणि दहशतवादी गटांनी या हत्येचा बदला घेण्याचा पण केला आहे. मात्र लगेचच प्रत्युत्तरादाखल हल्ले केले नाहीत. तर, लेबॅनॉन-इस्रायल सीमेवर हिझाबोल्लाह आणि इस्रायलदरम्यानही क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले झाले. इस्रायलने हमासविरुद्ध पुकारलेल्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत २० हजार ४०० पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले असून सुमारे २३ लाख विस्थापित झाले आहेत.
इस्रायलने केलेल्या हवाईहल्ल्यात सिरियाची राजधानी दमास्कस येथे सोमवारी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा ब्रिगेडिअर जनरल राझी मौसावी मारला गेला. इराण आणि सिरियामधील लष्करी आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र लेबेनॉन येथील दहशतवादी गट हिझाबुल्लाह यांन शस्त्रे पाठवण्यास मदत करत असल्याचा इस्रायलला दाट संशय होता. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैझी यांनी इस्रायलला या कृत्याची किंमत चुकवावी लागेल, असा पण केला आहे.
तर, इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी हमासच्या दहशतवाद्यांविरुद्धचा लढा कायम सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे. इस्रायल अजूनही हमासने ओलिस ठेवलेल्या उर्वरित इस्रायली नागरिकांची सुटका करू शकलेली नाही. त्यामुळे नेतान्याहू यांच्यावरील दबावही वाढत चालला आहे.
हे ही वाचा:
अंजू जॉर्ज म्हणते, तो काळ चुकीचा, मोदींच्या काळात खेळांची प्रगती!
अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांचा वाजणार शंख!
सिने समीक्षक के. आर. के ला मुंबईत अटक
सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांबद्दल राहुल गांधी गप्प का ? बीआरएसच्या के. कविता यांचा सवाल
कायमस्वरूपी युद्धविराम केल्यास गाझा पट्टीमध्ये पुन्हा सत्तास्थापना करण्यास दिली जाईल, असा प्रस्ताव इजिप्तने हमासने आणि त्यांची साथीदार संघटना इस्लामिक जिहादला दिला होता. मात्र तो त्यांनी फेटाळून लावला. तसेच, उर्वरित ओलिसांची सुटका करण्यासंदर्भातील चर्चाही निष्फळ ठरली. इजिप्त या युद्धात दोन्ही देशांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. अजूनही हमासकडे १०० ओलिस असल्याचे समजते.