इस्रायलने हमासविरुद्ध पुकारलेल्या युद्धात आता मीडियालाही इशारा दिला आहे. अल जझीरा या मीडिया हाऊसचे वेस्ट बँकमधील कार्यालय बंद केले आहे.
अल जझीराच्या कार्यालयात इस्रायलचे जवान दाखल झाल्याचे व्हीडिओ अल जझीराने दाखविले. पहाटे ३ वाजता इस्रायलचे सैनिक या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत कार्यालय रिकामे करण्यास त्यांना सांगण्यात आले. अल जझीराला ४५ दिवस कार्यालय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
या कारवाई दरम्यान, इस्रायलच्या सैनिकांनी अल जझीराच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवली नाही. पण काही पत्रकारांना या ऑपरेशनचे वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर रविवारी मोठ्या पोलादी पट्ट्यांच्या सहाय्याने कार्यालय बंद करण्यात आले. त्या पट्ट्यांना वेल्डिंग करण्यात आले.
हे ही वाचा:
आरडाओरडा करणाऱ्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याची मागणी
दहशतवादाचा नवा पॅटर्न ‘रेल जिहाद’
इराणच्या कोळसा खाणीत स्फोट, ५१ जणांचा मृत्यू, २० जण जखमी!
इस्रायलचे संपर्क मंत्री श्लोमो कार्ही यांनी एक्सवर पोस्ट टाकत म्हटले आहे की, कतार सरकारचा पाठिंबा असलेल्या अल जझीरावर असा आरोप आहे की, त्यांनी इस्रायलच्या शत्रूंचे मुखपत्र म्हणून काम केले. आपल्या सैनिकांचे रक्षण करण्यासाठी मग इस्रायलला पाऊल उचलावे लागले.
इस्रायलने गाझावर जो हल्ला केला, त्याचे अल जझीराने वार्तांकन केले. यासंदर्भात इस्रायली परदेशी प्रेस असोसिएशनने मात्र इस्रायलने या कारवाईचा पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. परदेशी पत्रकारांना लगाम घालणे किंवा त्यांची कार्यालये बंद करणे यामुळे लोकशाही मूल्यांचे हनन होते, असे त्यांनी म्हटले आहे.
मे महिन्यात जेरुसलेम येथील अल जझीराच्या कार्यालयालाही टाळे लावण्यात आले होते. शिवाय, देशात कुठेही वार्तांकन कऱण्यासही बंदी घालण्यात आली. इस्रायलचे राष्ट्रप्रमुख नेत्यानाहू यांनी म्हटले आहे की, इस्रायलच्या सुरक्षेला नख लावण्याचे काम या नेटवर्कच्या पत्रकारांनी केलेले आहे त्यामुळे हमासचे मुखपत्र असलेल्या या मीडिया हाऊसला देशाबाहेर जावे लागेल.