इस्रायलने हमासला एक सर्वसमावेशक अशा शांतता योजनेचा प्रस्ताव सादर केला असून त्यामध्ये इस्रायली ओलिसांना परत करणे आणि गाझामधील नागरी क्षेत्रांची पुनर्बांधणी करणे समाविष्ट आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी दिली.
‘हे युद्ध संपण्याची वेळ आली आहे. नवीन दिवस सुरू होण्याची वेळ आली आहे. शांततेची संधी साधण्यासाठी आम्ही हा क्षण गमावू शकत नाही,’ असे जो बायडेन व्हाईट हाऊसमधून प्रसारित केलेल्या भाषणात म्हणाले. ‘ज्याला शांतता हवी आहे, त्यांनी आता आवाज उठवला पाहिजे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काम केले पाहिजे. हे युद्ध संपण्याची वेळ आली आहे,’ असे बायडेन म्हणाले. त्यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना ‘हा क्षण गमावू नका’ असे आवाहन केले.
अध्यक्ष बायडेन यांच्या मते, प्रस्तावित शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांसाठी युद्धविरामाचा समावेश असेल. या दरम्यान इस्रायल आणि हमास नेते गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर सुरू झालेले युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करतील. वाटाघाटींना सहा आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागल्यास, जोपर्यंत करार होण्यास वेळ लागेल तोपर्यंत युद्धविराम सुरू राहील, असेही ते म्हणाले.
शांतता प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात हमासने ओलिसांची सुटका करणे आणि इस्रायलने गाझामधून आपले सैन्य मागे घेणे यांचा समावेश असेल. अंतिम टप्पा हा मोठ्या पुनर्रचना योजनेचा असेल, असे ते म्हणाले. यापूर्वी गुरुवारी, हमासने असेही म्हटले होते की, जर इस्रायलने गाझामधील लोकांविरुद्धचे युद्ध थांबवले तर ते ओलिसांच्या देवाणघेवाणीसह संपूर्ण शांतता करारापर्यंत पोहोचण्यास ते तयार आहेत. ‘आक्रमणामुळे आमच्या लोकांची होणारी उपासमार आणि नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामाच्या वाटाघाटी चालू ठेवून या धोरणाचा भाग होणे हमास आणि पॅलेस्टिनी गटाकडून स्वीकारले जाणार नाही,’ असे ‘हमास’च्या निवेदनात म्हटले होते.
हे ही वाचा:
रविवारी केजरीवाल जाणार पुन्हा तुरुंगात
पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली
‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण
प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले
इस्रायलच्या गाझा हल्ल्यात ३६ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, असे हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने सांगितले. इस्रायलने ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायली समुदायांवर हल्ला केल्यानंतर हमासच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी हवाई आणि जमिनीवर युद्ध सुरू केले. हमासच्या हल्ल्यात सुमारे १२०० लोक मारले गेले आणि २५० हून अधिक ओलीस ताब्यात घेतले.