इस्रायलने उत्तर गाझामध्ये हमासच्या सुमारे आठ हजार दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे, तर अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी मध्य पूर्वेकडील देशातील नेत्यांच्या घेतलेल्या स्वतंत्र भेटींमध्ये, इस्रायल-हमासदरम्यानचे युद्ध शेजारच्या राष्ट्रांत पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
इस्रायलने शनिवारी उत्तर गाझामधील हमासचे जाळे उद्ध्वस्त केल्याचा दावा करत तीन महिन्यांत सुमारे आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगितले. यावेळी अमेरिका आणि युरोपीय संघाने इस्रायलच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र भेट घेतली आणि इस्रायल-हमासदरम्यानचे युद्ध शेजारच्या लेबेनॉन आणि मध्य पूर्वेकडील अन्य देशांमध्ये पसरत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
युद्धविराम आणि गाझामध्ये मानवतावादी मदत पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असूनही इस्रायल संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनिअल हागेरी यांनी मध्य आणि दक्षिण गाझामधील हमासचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट केले. दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात इस्रायली संरक्षण दलाने बॉम्बहल्ले तीव्र केले आहेत. एका निवासी इमारतीत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे १२ जण ठार तर, ५० जण जखमी झाले आहेत. तर, मध्य गाझामध्ये एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले आहेत. तर, खान युनिस शहरातील अल-अमल रुग्णालयाजवळ जोरदार गोळीबार झाल्याचे सांगण्यात येते. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे आणि त्यांच्याकडून लष्करी साहित्य जप्त केल्याचे इस्रायली लष्करातर्फे सांगण्यात आले.
हे ही वाचा:
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!
शिवछत्रपती पुरस्कार यादीतून डावललेल्या खेळांच्या संघटना नाराज
निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार, मतदान केंद्राला लावली आग!
अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प
शनिवारी, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी तुर्की आणि ग्रीसमधील नेत्यांची भेट घेतली. ते आठवडाभराच्या मध्यपूर्वेकडील देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते इस्रायल, वेस्ट बँक, जॉर्डन, कतार, यूएई, इजिप्त आणि सौदी अरेबियाला भेट देतील. इस्रायलच्या गाझामधील लष्करी कारवाईचा जाहीर निषेध करणाऱ्या तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री हकान फिदान आणि ध्यक्ष ताय्यिप एर्डोगान यांची त्यांनी भेट घेतली. तर, युरोपीय महासंघाचे राजदूत जोसेप बोरेल यांनी लेबेनॉनची राजधानी बैरूत येथे इस्रायलचे सुरक्षा दल आणि इराणसमर्थित हिजाबुल्लाह गट यांच्यात सुरू असलेल्या चकमकीबद्दल आणि हे युद्ध शेजारच्या राष्ट्रांत पसरत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. हिजाबुल्लाह गटाने शनिवारी इस्रायलच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागली. हमासचे नेते सालेह अल-अरौरी याच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचे सांगण्यात आले.
पॅलिस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा पट्टीत सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत २२ हजार ७२२ जण मारले गेले आहेत.