हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित

५ हजारांहून अधिक रॉकेट्स डागले

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित

इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ची घोषणा करण्यात आली आहे. गाझा स्ट्रिपमधून हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा स्ट्रिपमधून इस्त्रायली भागावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु केले होते. इस्त्रायलवर अनेक रॉकेट डागण्यात आले. शिवाय अनेक दहशतवादी इस्त्रायलच्या भूमीत शिरले होते. त्यानंतर इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून ‘स्टेट ऑफ वॉर’ची घोषणा करण्यात आली आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी ५ हजाराहून अधिक रॉकेट्स इस्त्रायली भागावर डागले. रॉकेट हल्ल्यात एक वृद्ध इस्रायली महिला ठार झाली असून इतर १५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. देशाच्या दक्षिणेत आणि मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. लोकांनी घराच्या बाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय काही शहरांमध्ये सायरन वाजवून लोकांना  सतर्क करण्यात येत आहे. गाझा स्ट्रिपच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे हमास दहशतवादी संघटना आणि इस्त्रायल लष्करामध्ये संघर्ष होण्याची स्थिती आहे.

हे ही वाचा:

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

इस्त्रायलकडून सांगण्यात आले आहे की, “गाझा स्ट्रिपमध्ये हमास दहशतवादी संस्था कार्यरत आहे. देशावर जे हल्ले झाले त्यासाठी ही संघटनाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील.” इस्त्रायलचे सैन्य हमास दहशतवाद्यांसोबत तीव्र संघर्ष सुरु करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सुरक्षा प्रमुखांची बैठक होणार असून हमासला त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version