इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये बुधवार, ३१ जुलै रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यात हमासच्या राजकीय ब्युरोचे प्रमुख इस्माइल हनीयेह ठार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची पुष्टी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) केली आहे.
हमास प्रमुख इस्माइल हनीयेह हे मंगळवारी इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या शपथ ग्रहण समारंभात सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी म्हणजेचं बुधवारी हनीयेह यांचे घरचं लक्ष्य करण्यात आले. तेहरानमध्ये इस्माइल हनीयेह यांच्या घराला लक्ष्य करण्यात आलं, असं इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितलं. हनीयेह आणि त्यांचा बॉडीगार्ड या हल्ल्यात मारले गेले. स्फोट घडवून हनीयेह यांचा खात्मा करण्यात आला.
दरम्यान, हमासने हनीहेय यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच हा हल्ला इस्रायलने घडवून आणल्याचा दावा हमासने केला आहे. मात्र, इस्रायलने अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाही. इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कतारमध्ये राहणारे इस्माइल हनीयेह तेहरानमध्ये आले होते. एप्रिलच्या सुरुवातीला, इस्रायली हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते इस्माइल हनीयेह यांचे तीन मुलगे ठार झाले होते, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) दिली होती. हमासच्या लष्करी शाखेतील सेल कमांडर अमीर हनीयेह आणि मोहम्मद आणि हाझेम हनीयेह अशी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या तीन मुलांची नावे होती.
हे ही वाचा:
अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १४५ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू
अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद
यापूर्वी, लेबनानची राजधानी बेरुतवर इस्रायलने एअर स्ट्राइक केला होता. त्यात हिजबुल्लाहचा कमांडर फउद शुकर ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गोलान हाइट्स येथे शनिवारी एका फुटबॉल मैदानात रॉकेट हल्ला झाला होता. यात १२ लहान मुलांसह काही जणांचा मृत्यू झाला होता. हिजबुल्लाहला किंमत चुकवावी लागेल असा इशारा इस्रायलने आधीच दिला होता.