तुर्कस्थान सैन्य दलाच्या बरोबर झालेल्या चकमकीमध्ये इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी हा ठार झाला आहे. . तुर्कस्तानने सीरियाच्या हद्दीत घुसून ही कारवाई केली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी रविवारी ही माहिती दिली. गुप्तचर संस्था दीर्घकाळापासून इसिस प्रमुखाचा पाठलाग करत होत्या. अल-कुरेशी तुर्कीच्या राष्ट्रीय गुप्तचर संघटनेने केलेल्या कारवाईत सीरियामध्ये मारला गेल्याचे एर्दोगन यांनी सांगितले.
तुर्कीच्या सैन्य दलाची ही कारवाई उत्तर सीरियातील जंदारी शहरात झाल्याची माहिती सीरियाच्या संरक्षण सूत्रांनी दिली. हे शहर तुर्की-समर्थित बंडखोर गटांच्या ताब्यात आहे. सीरियाच्या राष्ट्रीय लष्कराने या कारवाईबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री कारवाई सुरू झाली.
इस्लामिक स्टेटने २०१४ मध्ये अतिशय वेगाने आपला प्रभाव पसरवला आणि इराक आणि सीरियातील विस्तीर्ण भागांवर कब्जा केला. त्यावेळी त्याचा प्रमुख अबू बकर अल-बगदादी याने संपूर्ण प्रदेशात इस्लामिक खिलाफत घोषित केली होती.
सीरिया आणि इराकमधील अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या सैन्याने तसेच इराण, रशिया आणि विविध निमलष्करी दलाचे समर्थन असलेल्या सीरियाच्या लष्कराने केलेल्या कारवाईमुळे इसिसने नंतर या प्रदेशावरील आपली पकड गमावली.
हे ही वाचा:
मद्यपी पोलिसांना हिमंता बिस्वसर्मांनी कायमचे घरी पाठवले
उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!
नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !
३८ लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी धाडले यमसदनी
अबू हुसेन अल-हुसेनी अल-कुरेशी हे अबू हुसेन अल-कुरैशी म्हणून ओळखला जात होता. इस्लामिक स्टेटचा पूर्वीचा नेता दक्षिण सीरियातील एका कारवाईत मारला गेल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये आयएसने अल-कुरेशीची प्रमुख म्हणून निवड केली. जवळपास सहा महिन्यानंतर जगातील सर्वात भयंकर दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाचा अंत झाला आहे.