भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला असून हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात आंदोलन पेटले असून या आंदोलनामागे इस्लामी छात्र शिबीर (आयसीएस) ही संघटना असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. इस्लामी छात्र शिबीर ही संघटना जमात-ए-इस्लामी बांगलादेश या संघटनेची विद्यार्थी शाखा असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय या संघटनेला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा असल्याचे मानले जाते आहे.
गेल्या दोन वर्षांत अनेक इस्लामी छात्र शिबीर संघटनेच्या कार्यकर्त्यांना बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला आहे. येथूनच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भडकावण्याचे काम सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे, सरकारी नोकऱ्यांसाठीच्या आरक्षण कोटा संबंधीच्या आंदोलनात गेल्या दोन महिन्यांत रस्त्यावर उतरलेले आंदोलक हे केवळ विद्यापीठाचे विद्यार्थी होते.
बांगलादेशातील ढाका विद्यापीठ, चितगाव विद्यापीठ, जहांगीर विद्यापीठ, सिल्हेट विद्यापीठ आणि राजशाही विद्यापीठ ही इस्लामी छात्र शिबीरची मुख्य केंद्रे आहेत. गेल्या तीन वर्षांत विद्यापीठाच्या निवडणुका जिंकलेल्या सर्व विद्यार्थी संघटना या इस्लामी छात्र शिबीरच्या पाठिंब्याने जिंकल्या आहेत. या संघटनेचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी खूप खोलवर संबंध असल्याचे मानले जाते. शिवाय या संघटनेचे अनेक कार्यकर्ते पाकिस्तानात गेले आहेत. आयएसआयचे सदस्य विद्यार्थ्यांचे बनावट डीपी लावून विद्यार्थी आंदोलनात सामील झाले होते. शिवाय विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर भडकावण्यात आले होते. इस्लामी छात्र शिबीरचे विद्यार्थी आयएसआयच्या तावडीत अडकले आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले, अशी माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिली आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशातील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून मंदिर पेटवले
“बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्यासाठी तयार राहा”
मूकबधिर तरुणांनीच केली मूकबधिर तरुणाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये
भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !
दरम्यान, शेख हसीना यांनी आरोप केला होता की, जमात-ए-इस्लामी आणि त्यांची विद्यार्थी शाखा म्हणजेच इस्लामी छात्र शिबीर या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहे आणि देशात हिंसाचार भडकवत आहेत. शिवाय त्यांच्या सरकारने गेल्या आठवड्यात या पक्षावर बंदी घातली होती. ही संघटना मदरशांच्या कार्यातही सहभाग घेत असल्याची बाब समोर आली आहे. शेख हसीना या सलग चौथ्यांदा सत्तेत आल्यानंतर या वर्षी ‘इंडिया आउट’ मोहिमेला वेग आला होता. मानले जाते की, इस्लामी छात्र शिबीरने ही मोहीम उभी केली होती. मालदीवमधील अशाच निषेधाच्या धर्तीवर या मोहिमेमागील संपूर्ण कट रचण्यात आला होता. हा कट पाकिस्तान आणि आयएसआयचा होता, असे सूत्रांनी सांगितल्याचे ‘इंडिया टुडे’ने म्हटले आहे.