कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना मुंबई शहरात पुन्हा नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
शनिवारी मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर एक टक्क्याच्या वर गेला आहे. गेल्या दहा दिवसांत नवीन कोरोना रुग्णांमध्ये २७ टक्के वाढ झाली आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला शहरात नवीन रुग्णांची संख्या वाढत ३०० वर गेली होती. मात्र काही दिवसांपूर्वी ही संख्या पुन्हा २०० च्या खाली आली होती. गेल्या चार दिवसांपासून दररोज रुग्णसंख्या ३०० च्या वरच आहे. शनिवारी ३८८ नवे रुग्ण सापडले असून, चार रुग्णांचा मृत्यू झाला झाला. १० दिवसांपूर्वी १८ ऑगस्टला ३८३ नवीन कोरोना रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार केवळ १० दिवसांत नवीन रुग्णांमध्ये २७ टक्के वाढ झाल्याचे दिसते.
हे ही वाचा:
भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश
ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?
जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ
१८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी पॉझिटिव्हिटीचा दर ०.७३ टक्के होता म्हणजेच एक टक्क्यापेक्षा कमी होता. दहा दिवसांत हाच दर एक टक्क्याहून अधिक झाला. शनिवारी पॉझिटिव्हिटीचा दर १.०३ टक्के होता. १६ ऑगस्ट रोजी १९० रुग्णांची नोंद झाली होती तर २६ ऑगस्टला ३९७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच दुप्पट दर कमी झाला आहे. १८ ऑगस्टला मुंबईचा दुप्पट दर कालावधी २०५७ इतका होता. १० दिवसांत हा दुप्पट दर ३४४ दिवसांनी कमी झाला. शानिवारी मुंबईचा दुप्पट दर १७१३ दिवस इतका होता.
रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णदर एक टक्क्यांहून अधिक असून याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. १५ ऑगस्टपासून सर्व सेवा सुरू झाल्यामुळे परिणाम झाला आहे. मात्र आता काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मार्च- एप्रिलमध्ये काय झाले होते हे लोक बहुतेक विसरले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात अजून परिस्थिती स्पष्ट होईल असे, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले आहे.