वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन मॉस्को विमान अपघातात ठार की काटा काढला?

वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन मॉस्को विमान अपघातात ठार की काटा काढला?

नुकतेच रशियातील उच्च पदाधिकाऱ्यांविरोधात बंड केलेले, भाडोत्री सशस्त्र गटाचे प्रमुख येवगेनी प्रीगोझीन यांचा मॉस्को येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वॅग्नरशी संबंधीत असलेल्या ‘ग्रे झोन’ च्या टेलिग्राम चॅनेलने याबाबतचे वृत्त जाहीर केले आहे. तसेच, त्यांना नायक आणि देशभक्त म्हणून गौरवले आहे.

रशियाचे सर्वात शक्तिशाली भाडोत्री सशस्त्र गटाचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन हे प्रवास करत असलेले विमान बुधवारी संध्याकाळी मॉस्कोच्या उत्तरेला कोसळले. या विमानातील कोणीही वाचू शकले नाही, अशी माहिती रशियन अधिकार्‍यांनी दिली. लष्कराच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच बंड पुकारले होते. मात्र नंतर त्यांनी ते मागे घेतले होते. रशियन सरकारचे मुख्यालय क्रेमलिन किंवा संरक्षण मंत्रालयाकडून प्रीगोझिनच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी आलेली नाही.

व्हॅगनर, ग्रे झोनशी जोडलेल्या एका टेलिग्राम चॅनलने त्याला मृत घोषित केले, तथापि, त्याला एक नायक आणि देशभक्त म्हणून गौरवले. तसेच, ‘रशियातील देशद्रोह्यां’मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. मात्र हे देशद्रोही कोण, ही नावे यात जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रीगोझीनच्या समर्थकांनी हा अपघात रशियन सरकारनेच घडवून आणला असावा, असा कयास बांधला आहे. तर काहींनी यासाठी युक्रेनकडे बोट दाखवले आहे. युक्रेन गुरुवारीच स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.

हे ही वाचा:

जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे रॅगिंग हेच कारण

३७० कलमात मणिपूरचा मुद्दा घुसडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हाणून पाडला

१६ आमदारांकडून नार्वेकरांना ६ हजार पानी उत्तर

चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर

प्रीगोझिनच्या मृत्यूमुळे वॅग्नर गटाचे अस्तित्वच नामशेष होण्याची शक्यता आहे. याच व्हॅगनर गटाने दोन महिन्यांपूर्वी, जूनमध्ये सशस्त्र बंडखोरी करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा रोष ओढवून घेतला. या अपघातामागे कोणीही असो मात्र प्रीगोझिन यांच्या मृत्यूमुळे सन १९९९पासून सत्तेवर असणाऱ्या पुतीन यांना अशा व्यक्तीपासून मुक्त केले, ज्याने या रशियन नेत्याला सर्वांत गंभीर आव्हान दिले होते.

रशियाची हवाई वाहतूक संस्था रोसाव्हिएत्सियाने या विमान अपघातातील सर्व १० प्रवाशांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये प्रीगोझिनसह व्हॅगनरचा सह-संस्थापक दिमित्री उत्कीन याचाही समावेश आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी रशियन तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. काही अज्ञात स्त्रोतांनी रशियन मीडियाला सांगितले की, जमिनीवरून हवेत मारा करणारी एकापेक्षा अनेक क्षेपणास्त्रे डागून हे विमान पाडले गेले. अर्थात, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला जाणारे हे विमान ट्वर प्रदेशातील कुझेनकिनो गावाजवळ कोसळले होते, अशी माहिती रशियाच्या आपत्कालीन विभाग मंत्रालयाने दिली.

Exit mobile version