एकीकडे रशिया- युक्रेन आणि इस्रायल- गाझा यांच्यात युद्ध पेटलेलं असताना दुसरीकडे इराण आणि पाकिस्तान यांच्यातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता. याला पाकिस्तानने प्रत्युत्तरही दिले होते. अशातच आता इराणने पुन्हा एकदा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला आहे.
इराणच्या सैन्याने पाकिस्तानात घुसून जैश-अल-अदलच्या ठिकाणांवर हल्ला केला आहेत. या कारवाईत इराणच्या लष्कराने जैश-अल-अदल दहशतवादी संघटनेचा कमांडर इस्माइल शाहबख्श आणि त्याच्या काही साथीदारांचा खात्मा केला आहे. इराणी सैन्याने सिस्तान- बलूचिस्तान या सीमावर्ती भागात घुसून दहशतवादी शाहबख्शला संपवलं. अलीकडेच दोन्ही देशांनी परस्परांवर हवाई हल्ले केले होते.
माध्यमांच्या अहवालानुसार, जैश-अल-अदलची स्थापना २०१२ मध्ये झाली होती. हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे. इराणने जैश-अल-अदलला दहशतवादी संघटना जाहीर केलेलं आहे. ही संघटना इराणच्या दक्षिणपूर्व प्रांत सिस्तान-बलूचिस्तानामधून ऑपरेट होते. मागच्या काही वर्षात जैश-अल-अदलने इराणी सैन्याच्या जवानांना लक्ष्य केलं होतं. गतवर्षी डिसेंबर महिन्यात जैश-अल-अदलने सिस्तान-बलूचिस्तानमधील एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यानंतर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात ११ पोलिसांचा मृत्यू झाला होता.
जैश-अल-अदल इराणच्या सैन्य इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून सीरियामध्ये करण्यात येत असलेल्या हल्ल्यांच्या आणि सिस्तान- बलुचिस्तान प्रांतात इराणच्या सैन्याकडून सुन्नी लोकांच्या कथित छळाच्या विरोधात आहे. जैश-अल-अदलला इराणमधील सुन्नींसाठी सिस्तान-बलुचिस्तान प्रांत मुक्त करायचा आहे, जेणेकरून बलुच लोकांना तेथे अधिक अधिकार मिळू शकतील.
हे ही वाचा:
बहीण, आईला छळणाऱ्यांना रोखणाऱ्या अल्पवयीन मुलावर गोळीबार
आसामचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल
भारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!
धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!
मागच्या महिन्यात इराण आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी परस्परांच्या हवाई क्षेत्रात घुसून एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर इराण आणि पाकिस्तान परस्परांना सुरक्षा सहकार्य करण्यास राजी झाले होते. या कराराची घोषणा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी आणि त्यांचे इराणी समकक्ष होसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती.