हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष रईसी यांचा मृत्यू 

परराष्ट्र मंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांचाही मृत्यू

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष रईसी यांचा मृत्यू 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यासोबतच परराष्ट्र मंत्रीही अपघातात ठार झाले आहेत. इराणी माध्यमांनी दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. हेलिकॉप्टर जिथं कोसळलं ते ठिकाण सापडलं असून हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले आहेत. अजरबैजानमधील घनदाट आणि पर्वतीय भागात रविवारी हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. या हेलिकॉप्टरमधून इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्र्यांसह इतर अधिकारी जात होते.

अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. रविवारी संध्याकाळी या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग झाले होते त्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी येत होत्या.

इराणी मीडियानुसर, बचाव पथकाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं असून या भीषण अपघातातून कोणी वाचण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे, असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर आता त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री केजरीवाल हे धूर्त, अहंकारी अन सर्वात मोठे बेईमान’

गोंधळामुळे राहुल गांधी, अखिलेश यांचा भाषण न करताच काढता पाय!

‘शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखालीच्या बहिणींना दोष देत आहेत’

मालीवाल यांच्यावरील हल्ला जीवघेणा असू शकतो

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याच्या वृत्तानंतर इराणचा दीर्घकाळ प्रतिस्पर्धी असलेल्या सौदी अरेबियाने रविवारी याबाबत मोठी चिंता व्यक्त करून त्यांच्या शोधासाठी मदत देऊ केली होती. कतारनेही या दुर्घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करून रईसी यांच्या शोधासाठी सर्वतोपरी साह्य करण्याचा प्रस्ताव दिला होता.

Exit mobile version