इराणने रविवारी थेट आपल्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन सोडल्यामुळे दोन्ही राष्ट्रांवरील युद्धाचे सावट गडद झाले आहे. इस्रायलच्या सैन्याने केलेल्या दाव्यानुसार, इराणमधून १०० हून अधिक ड्रोन सोडण्यात आले होते. इराक आणि जॉर्डनमधील सुरक्षा सूत्रांनी डझनभर ड्रोन उडताना पाहिले. तर, अमेरिकी सैन्याने इस्रायलच्या दिशेने जाणारे इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा अमेरिकेने केला.
इस्रायली सैन्याने केलेल्या दाव्यानुसार, इराणने आतापर्यंत १००हून अधिक ड्रोनच्या साह्याने स्फोटके इस्रायलवर सोडली. तर, इस्रायलकडून इराणवर हल्ला करण्यासाठी हवाई क्षेत्र किंवा प्रदेश खुला करणाऱ्या कोणत्याही देशाला इराण ठामपणे उत्तर देईल, असा इशारा इराणचे संरक्षण मंत्री मोहम्मद रझा अशतियानी यांनी दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
ब्रिटिश लष्करी विमानांनी इराक-सीरिया सीमा भागात काही इराणी ड्रोन पाडल्याचा दावा इस्त्रायल टीव्हीने केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी असून इराणने हल्ला सुरू केल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी अमेरिका कधीही युद्धात उतरू शकते, असे व्हाईट हाऊसने रविवारी स्पष्ट केले आहे.
इराणने ड्रोन हल्ले केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीव येथील लष्करी मुख्यालयात इस्रायलचे युद्ध मंत्रिमंडळ बोलावले होते.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. ‘या हल्ल्यांमुळे तणाव वाढण्याचा आणि प्रदेशात अस्थिरता निर्माण होण्याचा धोका आहे. इराणने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, त्यांचा अराजकता पेरण्याचा हेतू आहे,’ अशी टीका सुनक यांनी केली. तर, इराणचे म्हणणे आहे की, त्यांनी इस्रायलला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्याचा एक भाग म्हणून आंतरखंडिय क्षेपणास्त्रे डागली आहेत.
हे ही वाचा:
रिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक
आयपीएलच्या ‘या’ पाच संघांकडे आहेत सर्वात मोठे मॅच फिनिशर
अजूनही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेऑफ खेळू शकते
सरकारी आयआरएनए वृत्तसंस्थेने एका अज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराणने इस्रायलमधील लक्ष्यांवर आंतरखंडिय क्षेपणास्त्रे डागली.
लेबनॉनच्या इराण-समर्थित हिजबुल्लाह याने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी इस्रायली-संलग्न गोलानवर रॉकेट डागले. येमेनच्या हुथी बंडखोरांनी इराणच्या समन्वयाने इस्रायलवर अनेक ड्रोन हल्ले केले, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी इराणने अमेरिकेला इस्रायलसोबतच्या संघर्षापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.