पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. गेल्या काही महिन्यात महागाईने पाकिस्तानची स्थिती बिकट केली आहे. त्यातच आता रमझान महिना आला आहे. पण महागाईने येथील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे.
केळ्याचे भाव तब्बल ५०० रुपये प्रतिडझन झाले आहेत तर द्राक्षे १६०० रुपये किलोच्या भावाने मिळत आहेत. खजुराची किंमतही अशीच खिसे कापणारी ठरते आहे. एका किलोच्या खजुरामागे लोकांना १००० रुपये भरावे लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत फळे आणि भाज्या यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
आता ही महागाई केवळ एखाद्या शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही तर सगळ्या शहरांना महागाईने विळखा घातला आहे. कराची, रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर या शहरांत महागाईने टोक गाठले आहे. त्यामुळे खरेदीत घट झालेली पाहायला मिळते आहे.
हे ही वाचा:
सावधान.. १३५ दिवसानंतर कोरोनाचे सक्रिय रुग्ण गेले १० हजारांच्यावर
‘बाबुलनाथ’ मंदिरातील शिवलिंग उत्तम स्थितीत, तडे गेलेलेच नाहीत!
विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी
बुडत्या सिलिकॉन व्हॅली बँकेला मिळाला फर्स्ट सिटीझनचा आधार
पाकिस्तानला प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. जागतिक बँकेनेही त्यांना कर्ज दिलेले नाही. शाहबाज शरीफ सरकारही हतबल झाल्याचे दिसते आहे. पाकिस्तानातील महागाईचा दर ३१.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जो गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक आहे.
कराचीतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी एका किलोमागे खजूर ३५० रुपये होता तो आता १ हजार रुपये झालेला आहे. केळ्याचे भावही वाढले आहेत. एक डझन केळी घेणेही आता लोकांना मुश्कील झाले आहे. रमझानच्या महिन्यात फळे, खजूर यांना मागणी असते. पण पाकिस्तानात या वस्तू विकत तरी कशा घ्यायच्या असा प्रश्न जनतेसमोर आहे.
त्यातच गेल्या वर्षी प्रचंड पुराने पाकिस्तानची अवस्था अधिकच बिकट झाली होती. त्यात एक तृतियांश पाकिस्तान पाण्याखाली होता. त्यातून अजून पाकिस्तान सावरलेला नाही.