पाकिस्तानच्या कितीपट आहे भारताचा खजिना?
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तुम्हाला हे माहीत आहे का, की भारताचा परकीय चलनसाठा पाकिस्तानच्या तुलनेत कितीपट मोठा आहे? हा तब्बल ७१.७४ पट मोठा आहे. म्हणजेच भारताच्या परकीय चलन साठ्यात पाकिस्तानसारखे ७२ चलनसाठे सामावले जाऊ शकतात. भारताच्या परकीय चलनसाठ्यामधील निधी १४ जून रोजी संपलेल्या आठवड्यात २.९२ अब्ज डॉलर घटून ६५२.८९ अब्ज डॉलर झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली.
याआधीच्या आठवड्यात परकीय चलनसाठा ४.३० अब्ज डॉलरच्या उच्चांकासह ६५५.८२ अब्ज डॉलरच्या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी संपुष्टात आलेल्या आठवड्यात चलनसाठ्याचा मुख्य भाग मानल्या जाणाऱ्या विदेशी चलनसाठ्यात २.०९ अब्ज डॉलरची घट होऊन तो ५७४.२४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला होता. डॉलरमध्ये चढउतार झाल्यास परकीय चलनसाठ्यात ठेवण्यात आलेले युरो, पाऊंड आणि येन या बिगर अमेरिकी चलनावरही परिणाम होतो.
सुवर्णसाठ्याच्या मूल्यातही घसरण
सुवर्णसाठ्याचे मूल्य १.०१ अब्ज डॉलर घटून ५५.९७ अब्ज डॉलर झाले. विशेष आहरण अधिकारमध्ये (एसडीआर) ५.४ कोटींची घट होऊन ते १८.११ डॉलरपर्यंत पोहोचले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असणाऱ्या भारताच्या ठेवीतही २४.५ कोटी डॉलरने वाढ होऊन ती ४.५८ अब्ज डॉलर झाली आहे.
हे ही वाचा:
‘मी इतक्या पुढचा विचार करत नाही’ भारताच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत गंभीर यांची भूमिका
नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी हिंदुजा कुटुंबातील चार जणांना साडेचार वर्षांपर्यंतची शिक्षा
खालिस्तानी दहशतवादी निज्जरला संसदेत श्रद्धांजली देणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात पेपफुटी विरोधातील कायदा लागू
पाकिस्तानच्या खजिन्यात किरकोळ वाढ
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या परकीय चलनसाठ्यात ३१ दशलक्ष डॉलरची किरकोळ वाढ झाली आहे. १४ जून रोजीपर्यंत परकीय चलनसाठ्यातील निधी ९.१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक बँकांजवळील एकूण विदेशी चलनसाठा ५.३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. तर, पाकिस्तानचा एकूण लिक्विड चलनसाठा १४.४ अब्ज डॉलर आहे.