अवघ्या सोळा वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने यशस्वी चाल खेळत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभव करून त्याला मोठा धक्का दिला आहे.
आज सकाळी ऑनलाइन जलद बुद्धिबळ सामन्यात प्रज्ञानंदने काळे मोहरे खेळत कार्लसनला ३९ चालींमध्ये पराभूत केले. भारतीय ग्रँडमास्टरने या विजयातून आठ गुण मिळवले असून आठव्या फेरीनंतर तो संयुक्त बाराव्या स्थानी आहे. मागील फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या कार्लसनवर प्रज्ञानंदला विजय अनपेक्षित होता.
याआधी त्याने फक्त लेव्ह अरोनियनविरुद्ध विजय नोंदवला होता. याशिवाय प्रज्ञानंदने दोन गेम अनिर्णित राहिले, तर चार गेममध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्याने अनिश गिरी आणि क्वांग लिम विरुद्धचे सामने अनिर्णित केले तर एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टॉफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
रशियाचा इयान नेपोम्नियाची १९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यानंतर डिंग लिरेन आणि हॅन्सन हे दोघे १५ गुणांवर आहेत. एअरथिंग्स मास्टर्समध्ये सोळा खेळाडू सहभागी आहेत. यामध्ये, खेळाडूला विजयासाठी तीन गुण आणि ड्रॉसाठी एक गुण मिळतो. प्राथमिक टप्प्यात अजून सात फेऱ्या खेळायच्या आहेत.
हे ही वाचा:
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या
काश्मीर पंडितांच्या नरसंहाराची कथा मांडणाऱ्या ‘काश्मीर फाईल्स’ चे ट्रेलर प्रदर्शित
नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवा
झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या
कोण आहे हा प्रज्ञानंद?
रमेशबाबू प्रज्ञानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी त्याने दहा वर्षांखालील विजेतेपद पटकावले. ग्रँडमास्टर बनणारा तो जगातील पाचवा सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. त्याला २०१८ मध्ये ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला. तेव्हा त्याचे वय १२ वर्षे होते. मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्याच्याआधी विश्वनाथन आनंद आणि पी हरिकृष्णा यांनी कार्लसनला पराभूत केले आहे.