भारतीयांनी अनुभवला सुदानमधील सुडाचा प्रवास

भारताने ऑपरेशन कावेरी या मोहिमेच्या अंतर्गत शेकडो भारतीयांना आतापर्यंत सुदानमधून बाहेर काढले आहे

भारतीयांनी अनुभवला सुदानमधील सुडाचा प्रवास

सुदान या इशान्य आफ्रिकेतील देश. या देशात सध्या रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) आणि सुदानी लष्कर यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. आधीच या देशात कधीही स्थैर्य नव्हते त्यात आता या संघर्षाची भर पडली आहे. या संघर्षामुळे तेथील भारतीयांचे जीवन असुरक्षित बनले असून त्यांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबविण्यात आले आहे. परतलेल्या भारतीयांनी सांगितलेल्या दहशतीच्या कहाण्या शहारे आणणाऱ्या आहेत.

हरयाणाचे सुखविंदर सिंग म्हणतात की, आम्ही जणू काही मृत्यूशय्येवरच झोपलो होतो. आम्हाला एका खोलीत आणण्यात आले होते, जणू काही आम्ही मृत्युच्या कराल दाढेतच आहोत.

उत्तर प्रदेशच्या छोटूला तर भारतात आलो याचे आश्चर्य वाटते आहे. आम्ही जणू काही थडग्यातूनच बाहेर आलो आहोत. आम्ही आता भारतात काहीतरी करून दाखवू. सुदानला यापुढे कधीही जाणार नाही, असे तो म्हणतो.

आणखी एका भारतीयाने सांगितले की, आमच्या कंपनीच्या बाहेर आरएसएफचा तंबू लावण्यात आला होता. सकाळी ९ वाजता आरएसएफने आमच्या कंपनीत प्रवेश केला. आम्हाला आठ तास बंदी बनवून ठेवले. त्यांनी रायफली आमच्या छातीवर रोखून धरल्या आणि आमच्याकडे होते नव्हते ते सगळे लुटले. आमचे मोबाईलही हिसकावून घेण्यात आले.

पंजाबच्या होशियारपूरमधील तसमेर सिंग म्हणाले की, आम्हाला एका छोट्या खोलीत ठेवण्यात आले होते. तिथे वीज आणि पाणी दोन्हीही नव्हते. आमच्या आयुष्यात अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती. देवाचे आभार मानतो की आम्ही सुखरूप परतलो.

हे ही वाचा:

‘राहुल गांधी पवारांविरोधात ट्वीट करण्याची हिंमत दाखवतील काय?’

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती काढून टाकण्याचा बोर्नव्हिटाला आदेश

तो शिकवत होता, फक्त १५ मिनिटांत एटीएम फोडण्याचं तंत्र…

सुदानमधून जिवंत बाहेर आलेल्या ज्योती अगरवाल म्हणाल्या की, नागरी वस्त्यांमध्येही क्षेपणास्त्र येऊन धडकत होती. माझी शेजारी गरोदर होती. अशाच एका क्षेपणास्त्र हल्ल्यात ती दगावली. तिला जागीच मृत्यू आला. संपूर्ण इमारतच कोसळली. त्यानंतर आम्ही आमच्या घराच्या खिडक्या, दरवाजे पूर्णपणे बंद ठेवले. पण त्यामुळे आम्ही गुदमरत होतो. क्षेपणास्त्र घरात येऊ नये यासाठी दरवाजे बंद करण्यावाचून पर्याय नव्हता. घरातील मुलांना अनेक दिवस गुदमरून काढावे लागले. आम्ही कसेबसे जिवंत बाहेर आलो आहोत. आता आम्ही परत सुदानला जाणार नाही.

भारताने ऑपरेशन कावेरी या मोहिमेच्या अंतर्गत शेकडो भारतीयांना आतापर्यंत सुदानमधून बाहेर काढले आहे. पहिल्या तुकडीत २७८ लोक समाविष्ट होते तर नंतर भारताने सी १३०जे हे हवाई दलाचे विमान पाठवून १२१ आणि १३५ जणांना बाहेर काढले. त्यांना सौदी अरेबियात नेण्यात आले. आतापर्यंत भारतीयांच्या सहा तुकड्या तिथून आलेल्या आहेत. त्यात जवळपास ११०० लोक आहेत. त्यांना सौदीला आणण्यात आले आहे.

सुदानी लष्कर आणि आरएसएफ यांच्यातील संघर्षात जवळपास ४५९ लोक मृत्युमुखी पडले आहेत. साधारणपणे ४ हजार लोक जखमी आहेत. सुदानमध्ये सध्या कोलाहलाचे वातावरण आहे. आधीच दुसऱ्या देशांच्या उधारीवर जगणारा हा देश कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. सुदानमधील १६ लाख लोकांना मदतीची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

 

Exit mobile version