सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वांत शक्तिशाली म्हणून गणला गेला आहे. ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२३’ने याबाबत घोषणा केली आहे. सिंगापूरचा पासपोर्ट असणारी व्यक्ती १९२ देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकते. याआधी जपान या यादीत अव्वल स्थानी होता. मात्र त्याची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ही यादी १८ जुलैला जाहीर झाली. भारताचे नागरीक ५७ देशात व्हिसाशिवाय जाऊ शकतात.
१९० देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची मुभा असणाऱ्या जर्मनी, इटली आणि स्पेन या तीन युरोपीय देशांनी संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. जपानने गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच आपले अव्वल स्थान गमावले आहे. तिसऱ्या क्रमांकावर जपानसह ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रान्स, लक्झेंबर्ग, दक्षिण कोरिया आणि स्वीडन या देशांनी संयुक्तपणे स्थान मिळवले आहे.
भारताचा या यादीत ८०वा क्रमांक आहे. या क्रमांकावर भारतासह सेनेगल आणि टोगो हे देश आहेत. या तिन्ही देशांतील नागरिकांना ५७ ठिकाणी व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. तर, १०१, १०२ आणि १०३व्या क्रमांकावर अनुक्रमे सिरीया, इराक आणि अफगाणिस्तानने स्थान मिळवले आहे. हे पासपोर्ट जगातील सर्वांत दुबळे मानले जात आहेत. पाकिस्तान या यादीत १००व्या स्थानी आहे.
१९९ देशांच्या पासपोर्टधारकांना २२७ ठिकाणांपैकी किती ठिकाणी व्हिसाशिवाय प्रवास करता येऊ शकतो, यावरून ‘द हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ काढण्यात आला आहे. जर, या देशाला व्हिसाची आवश्यकता नसेल तर त्यानुसार पासपोर्टला एक गुण मिळतो. तसेच, तुम्ही काही देशात अचानक गेलात तर तिथे तुम्हाला तातडीने व्हिसा दिला जातो, हेदेखील यात बघितले गेले आहे.
हे ही वाचा:
वकार यूनुस म्हणतो, पाक भारताला जगात कुठेही हरवू शकतो
मनुष्य- बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार
मणिपूर; महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जखमींची अदिती तटकरेंनी घेतली भेट
याबाबत गेली सहा वर्षे ब्रिटन या देशाची घसरण होत होती. मात्र यंदा दोन अंकांनी वर येत ब्रिटनने चौथे स्थान पटकावले आहे. हे स्थान ब्रिटनला सन २०१७मध्ये मिळाले होते. तर, अमेरिकेची या यादीत घसरण होत आहे. यंदाही दोन क्रमांकांनी घसरण होत अमेरिकेने आठवा क्रमांक मिळवला आहे. अमेरिकेच्या पासपोर्टवर केवळ १८४ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवासाची मुभा आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१४मध्ये अमेरिका आणि ब्रिटनने संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले होते. मात्र त्यानंतर दोन्ही देशांच्या क्रमांकात घसरण होऊ लागली.