अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये २९ ऑक्टोबर रोजी वरुण राज पुचा (वय २४ वर्षे) या भारतीय तरुणावर हल्ला करण्यात आला होता. या तरुणाचा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. जॉर्डन अँड्राडे (वय २४ वर्षे) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुळचा तेलंगणातील असलेला पी वरूण राज पुचा हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी होता.
जॉर्डन अँड्राडेने पोलिसांना सांगितले की, वरुण आणि तो एकमेकांशी हल्ल्यापूर्वी कधीही बोलले नव्हते. परंतु, वरूण धमकी देत असल्याचं कोणीतरी जॉर्डनला सांगितले. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करताना पोलिसांनी जीममधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या चौकशीतून असं समोर आलं की वरुण शांत स्वभावाचा विद्यार्थी होता. तसंच, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वालपरिसो विद्यापीठाने शोक व्यक्त केला आहे. “वरुण राज पुचा याच्या निधनाबद्दल आम्ही दुःख व्यक्त करत आहोत. आमच्या कॅम्पस समुदायाने एक विद्यार्थी गमावला आहे. त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी आमच्या सहवेदना आहेत,” असं निवेदन विद्यापीठाने जारी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण रविवारी (२९ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास शहरातील एका सार्वजनिक जिमममध्ये गेला असताना त्याची हत्या झाली. यासंदर्भात आपल्या कबुली जबाबात आरोपी जॉर्डन अँड्रॅडनं माहिती दिली आहे. जॉर्डन सकाळी जिमच्या मसाज रुममध्ये गेला असता तिथे वरुण आधीच हजर होता. “मी मसाज रूममध्ये गेलो तेव्हा मला वरुण थोडा विचित्र वाटला. त्याच्याकडून माझ्या जिवाला धोका असून तो माझ्यावर जीवघेणा हल्ला करू शकतो, असं मला वाटलं. त्यामुळे फक्त आपला जीव वाचवण्यासाठी मी त्याच्यावर हल्ला केला,” असं जॉर्डनने म्हटलं.
हे ही वाचा:
आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश
मेट्रोची कामे थांबवा, महापालिकेचे आदेश!
जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवादी उच्चशिक्षित; केमिकल्ससाठी होते खास कोडवर्ड
आरोपी जॉर्डनने सांगितले की, वरुण मसाज चेअरवर बसला होता. त्याच्याकडे गेलो आणि त्याच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला डोक्यात चाकूने भोसकलं. त्यावेळी आमच्यात कोणतीही झटापट झाली नाही. फक्त मी त्याच्यावर हल्ला केल्यानंतर मला विरोध करण्यासाठी त्यानं मला स्पर्श केला,” असं जॉर्डननं पोलिसांना सांगितलं.