युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण रशियन गोळीबार असल्याचे सांगितले जात आहे. खारकीवमध्ये गोळीबाराच्या कक्षेत येऊन या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असे खारकीवमध्ये जीव गमावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

२१ वर्षीय नवीन हा कर्नाटकातील चालगेरी येथील रहिवासी होता. तो वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून या घटनेची माहिती देत शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने लिहिले की, “आज सकाळी खारकीवमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून ही माहिती देताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. मंत्रालय त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.”

नवीन शेखरप्पा खारकीव येथील एका बंकरमध्ये लपून बसला होता. जीवनावश्यक वस्तू संपल्यामुळे तो सुपरमार्केट मध्ये सामान आणायला गेला होता. यादरम्यान झालेल्या गोळीबारामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घडामोडीनंतर भारताने रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना बोलावले आहे. यासह भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे वचन दिले आहे.

हे ही वाचा:

‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात

ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक

महेश मांजरेकरांना न्यायालयाचा दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश

कीवमधील भारतीय दूतावासात आश्रयाला आलेल्या जवळपास चारशे विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर रवाना करण्यात दूतावासाला यश आले आहे. आत्तापर्यंत एक हजार जणांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. काही विद्यार्थी अजूनही कीवच्या भागात अडकले आहेत. त्यांनी कर्फ्यू उठताच युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे जावे असे भारतीय दूतावासाने आदेश दिला आहे.

Exit mobile version