मालदीव आणि भारतामधील राजनैतिक संबंध ताणले असल्याच्या पार्श्वभूमीवर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी तेथील भूमीवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना १५ मार्चपर्यंत मालदीव सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सध्या तरी तेथील भारतीय सैनिक केंद्र सरकारच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सने (एमएनडीएफ) दिलेल्या माहितीनुसार, मालदीवमध्ये ७७ भारतीय सैनिक तैनात आहेत.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपची छायाचित्रे प्रसिद्ध करून भारतीय प्रर्यटनस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले होते. मालदीवला पर्याय म्हणून लक्षद्वीपची छायाचित्रे प्रसिद्ध केल्याचा आरोप करून मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या वर्षी मुइझ्झू हे मालदीवच्या अध्यक्षपदी निवडून आल्यापासून त्यांचे आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. चीनसमर्थक समजले जाणाऱ्या मुइझ्झू यांनी भारविरोधी मोहीम राबवल्याचे मानले जाते.
दशकभरापूर्वी भारताने मालदीवच्या क्षमता विकासासाठी ध्रुव हेलिकॉप्टर आणि डॉर्निअर लढाऊ विमान दिले होते. भारतीय संरक्षण दलाचे सैनिक या विमानांची काळजी घेतात आणि तेथील मालदीवच्या सैनिकांना प्रशिक्षणही देतात. हिंदी महासागरातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गिकेवर मालदीव हे स्थित आहे. त्यामुळे चीन, जपान आणि भारताला ऊर्जापुरवठा करण्यासाठी हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
हे ही वाचा:
दररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती
ईडी, सीबीआय आणि एनआयएचे पथक लंडनच्या दिशेने!
देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…
अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!
काही वर्षांपूर्वी चीनने चाचेगिरीविरोधी कारवायांच्या नावाखाली हिंदी महासागरातील एडनच्या आखातात आपली नौदलाची जहाजे पाठवण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून, भारतासाठी मालदीवचे महत्त्व आणखी वाढले आहे.
अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या मालदीवला दरवर्षी, भारतातून दोन लाखांहून अधिक लोक भेट देतात. माले येथील भारतीय उच्चायुक्तांच्या मते, सन २०२२मध्ये २.४१ नागरिकांनी आणि २०२३मध्ये सुमारे दोन लाख नागरिकांनी मालदीवला भेट दिली होती.