किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य

भारत सरकारचा विद्यार्थ्यांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला

किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य

मध्य आशियातील किर्गिस्तानमध्ये हिंसाचाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. किर्गिस्तानची राजधानी असलेल्या बिश्केक येथे मोठा हिंसाचार झाला असून, यामध्ये भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य झाल्याचे उघड झाले आहे. या हिंसाचारात पाकिस्तानी आणि भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बिश्केकमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार हिंसक संघर्ष सुरू आहेत.

१३ मे रोजी किर्गिझ आणि इजिप्शियन एका वसतिगृहात विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली होती. त्यानंतर वसतिगृहाला लक्ष्य करून गोंधळ घडवण्यात आला. याला काही वेळातच हिंसक वळण लागले, त्यानंतर वसतिगृहात उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. काही भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले की, किर्गिस्तानची राजधानीचे शहर असलेल्या बिश्केकमधील भडकलेल्या हिंसाचारादरम्यान आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या घटनांवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. सध्या परिस्थिती शांत असून विद्यार्थ्यांना दूतावासाच्या नियमित संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच घरातच थांबण्याचे सांगण्यात आले आहे.

किर्गिस्तान हे शिक्षणासाठी, विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसह भारतीय उपखंडातील असंख्य विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे हे एक अनुकूल ठिकाण आहे.

Exit mobile version