‘उबर’ च्या माध्यमातून तब्बल ८०० हून अधिक भारतीयांना अमेरिकेत गैरमार्गाने घुसवल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
राजिंदर पाल सिंग असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने कॅनडातून शेकडो भारतीय नागरिकांना सीमेपलीकडे आणण्यासाठी पाच लाख डॉलरपेक्षा अधिक कमाई केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी ४९ वर्षीय राजिंदर पाल सिंग याला तीन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. राजिंदर पाल सिंग उर्फ जसपाल गिल याने फेब्रुवारीमध्ये गुन्हा कबूल केला होता.
तस्करीच्या टोळीचा प्रमुख सदस्य असणाऱ्या सिंग याने पाच लाख डॉलरपेक्षा अधिक पैसे घेऊन कॅनडातून शेकडो भारतीय नागरिकांना सीमेपलीकडे आणले, असे न्याय विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कॅलिफोर्निया येथील रहिवासी असलेल्या सिंग याला मंगळवारी अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात अवैध तस्करी, आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ४५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. चार वर्षांच्या कालावधीत सिंग याने ८०० हून अधिक लोकांची कॅनडाच्या उत्तरेकडील सीमा ओलांडून अमेरिकेत आणि वॉशिंग्टन राज्यात तस्करी केली. सिंग याचे वर्तन केवळ अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादाक नव्हते, तर भारतातून अमेरिकेत अवैध मार्गाने आलेल्यांची सुरक्षाही त्याने धोक्यात आणली, असे यावेळी ऍटर्नी जनरल यांनी नमूद केले.
सिंग याच्या या कटामुळे भारतीय नागरिकांचे अमेरिकेमध्ये चांगले जीवन जगण्याची आशा धुळीस मिळाली. तसेच, त्यांच्या डोक्यावर ७० हजार अमेरिकी डॉलर इतके कर्जही आले, असेही ते म्हणाले. जुलै २०१८पासून सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कॅनडातून बेकायदा सीमा ओलांडलेल्या लोकांना सिएटल भागात नेण्यासाठी उबेरचा वापर केला गेला, असे या प्रकरणातील नोंदींचा हवाला देऊन प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हे ही वाचा:
पिकनिकला गेलेल्यांची कार पडली ३० फूट खड्ड्यात; तिघे दगावले!
सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित
केदारनाथमध्ये खेचरांनी हेलिकॉप्टरपेक्षा २६ कोटी अधिक कमावले!
रहिवासी संकुलांमध्ये बकऱ्यांची कत्तल करण्यास मनाई
सन २०१८ ते २०२२ पर्यंत सिंग हे अवैध कृत्य करत होता. भारतीय नागरिकांची बेकायदा अमेरिकेत तस्करी करण्यासाठी उबरच्या ६०० हून अधिक फेऱ्या मारल्या गेल्या. जुलै २०१८ ते एप्रिल २०२२ दरम्यान तस्करीशी संबंधित १७ उबर खात्यांवर ८० हजार डॉलर्सपेक्षा जास्त शुल्क आकारले गेले. सिंग याचे सहकारी वॉशिंग्टन राज्याबाहेर तस्करी केलेल्या प्रत्येकाला त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रत्येकी एका गाड्याचा वापर करत असत. या गाड्या भाड्याने घेतल्या जात. पहाटे सीमेजवळ या गाड्या येत आणि हे नागरिक तेथून वेगवेगळ्या गाड्यांनी इच्छित स्थळी पोहोचत. पोलिसांना कॅलिफोर्नियातील सिंग याच्या एका घरातून सुमारे ४५ हजार अमेरिकी डॉलर रोख आणि बनावट ओळखपत्रेही सापडली आहेत. सिंग याला तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर अमेरिकेतून हद्दपार केले जाणार आहे.