भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून या वाढत्या तणावाबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, १३ जानेवारी रोजी बांगलादेशचे उप उच्चायुक्त नुरल इस्लाम यांना समन्स बजावले. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्द्यावर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलावून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना बोलावल्यानंतर नुरल इस्लाम हे साऊथ ब्लॉकमधून जाताना दिसले.
द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करून भारत- बांग्लादेश सीमेवर पाच ठिकाणी तारेचे कुंपण बांधण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचा आरोप बांगलादेशने केल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा तणाव वाढला आहे. बांगलादेशचे गृह व्यवहार सल्लागार, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांच्या मते, (वायव्य) चापैनवाबगंज, नौगाव, लालमोनिरहाट आणि टिन बिघा कॉरिडॉरसह पाच भागात संघर्ष सुरू झाला आहे. चौधरी यांनी दावा केला की मागील सरकारने स्वाक्षरी केलेल्या असमतोल करारांमुळे बांगलादेश-भारत सीमेवर अनेक समस्या उद्भवल्या आहेत.
दरम्यान, रविवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयात दाखल झालेले भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी बैठकीनंतर सांगितले की, ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात सुरक्षेसाठी सीमेवर कुंपण घालण्याबाबत सामंजस्यता आहे. पुढे त्यांनी म्हटले की, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) या संदर्भात संवाद साधत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की या समजुतीची अंमलबजावणी होईल आणि सीमेवरील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी एक सहकारी दृष्टिकोन असेल.
हे ही वाचा :
सोनमर्ग- लडाखला जोडणाऱ्या बोगद्याचे पंतप्रधानांनी केले उदघाटन!
आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!
ग्रूमिंग गँग फाईल्स: ब्रिटनमधील अत्याचार, हत्या, बलात्काराचे भयंकर वास्तव!
निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री आतीशी यांच्या पदरात १८ लाख जमा!
बांगलादेशात आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. तर, बांगलादेशमधील मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकाराच्या धोरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशात हिंदुंवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.