गोवंश टिकला तर शेती-माती आणि गाव -माणसांच्या गोष्टी टिकतील. आपली संस्कृती टिकेल. देशी दुभते-दुधाळ जनावरं पाहायचे असतील, येणाऱ्या पिढ्यांना सकस आहार द्यायचा असेल, बैलपोळा साजरा करायचा असेल, तर गोवंश टिकवावा लागेल. गोवंश वाढवावा लागेल, असे आवाहन भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. हे आवाहन करतानाच त्यांनी गोवंश टिकविण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणून बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही मत मांडले आहे. त्यासाठी एका छकडा शर्यतीचे आयोजनही त्यांनी केले आहे.
पडळकर म्हणतात की, आपल्या ग्रामीण व्यवस्थेत बैलगाडा शर्यत ही महत्त्वाचा भाग आहे. बैलगाडा शर्यतीमुळे शेतकरी सकस बैलाचं पोषण करतो, त्याला सांभाळतो. त्यामुळेच तर आपल्या भागात खिलार सारखा गोवंश वाढला. पण बैलगाडा शर्यतीवर बंदी आणून आपल्याला हा गोवंशच नामशेष करायचाय काय?
या शर्यती ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कणा आहेत. देशी गोवंशाची जवळजवळ ८७ लाख जनावरे याआधी होती ती आता ५७ लाख राहिली आहेत. ३० लाखांची कत्तल झाली का, यावर विचार व्हायला हवा. माझी प्राणिप्रेमींना विनंती आहे की, त्यांनी ही जनावरे कशी कमी झाली हे शोधावे. गोवंशाचे रक्षण करण्यासाठी आपण ताकदीने एकत्र आले पाहिजे. एकत्र येऊन गटतट बाजूला ठेवले पाहिजेत. तामिळनाडूने विशेष कायदा केला आणि तिथल्या परंपरांचं जतन केले. कर्नाटकनेही देशी गोवंशाच्या बाबतीत निर्णय घेतला.आपल्याकडे मात्र दोन दोन तीन तीन वर्षे तारखा पडत नाहीत.
हे ही वाचा:
कोकणातील महापुरात उद्योग गेला वाहून
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
पडळकर म्हणाले की, म्हणूनच गोवंश टिकविण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून २० ऑगस्टला छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. आपणसगळ्यांनी यात उतरुया तरच सरकारला जाग येईल. जर आपण ताकदीने उतरलो नाही तर सरकारला त्याचे काही पडलेले नाही. त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, लोकांची पर्वा नाही. या शर्यतीतील विजेत्याला १ लाख ११ हजारांचे इनाम देण्यात येणार असून उपविजेत्याला ७७ हजार ७७७ रुपयांचे इनाम देण्यात येईल.