लडाखमधील पांगोंग त्सो तलावावर पाळत ठेवण्यासाठी भारतीय संरक्षण दलामध्ये जलद गस्ती नौकांची भर पडणार आहे. पूर्व लडाख सीमाप्रांतात सीमाप्रश्नावरून भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य गेल्या आठ महिन्यापासून आमने-सामने उभे ठाकले आहेत. नव्या वर्षातील ही पहिली ऑर्डर भारतीय सैन्याने आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत भारतीय कंपनीला दिली आहे. भारतीय सैन्याला या वर्षातच नव्या नौका मिळतील अशी आशा आहेत.
गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला वर्षभरात १२ वेगवान गस्ती नौका बनविण्याची ऑर्डर देण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. अतिउंचीवरील सीमाक्षेत्रातील पाणवठ्याच्या क्षेत्रात गस्तीसाठीदेखील या नौका वापरल्या जातील. उंचीवरील पँगाँग त्सो या तालावात चीनी सैन्य आणि भारतीय सैन्य नौका वापरतात. संरक्षण तज्ञांच्या मते चीनी सैन्याची बरोबरी करण्यासाठी वेगवान नौकांची गरज होती. ती आता पूर्ण होईल.नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी.एस जैसवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, चीनी सैन्य पूर्वीपासून जलदगती नौका वापरत होते.
चीनी सैन्य तलावात मोठ्या लाटा निर्माण करून भारतीयांच्या हलक्या नौकांना एका कडेला ढकलून देत असत. त्यामुळे भारतीय सैन्याला चीनी सैन्याशी टक्कर देणाऱ्या नौकांची गरज होती. ही गरज आता या जलद नौकामुळे पूर्ण होणार आहे.हिंदुस्थान टाईम्सच्या पूर्वीच्या वृत्तानुसार भारतीय सैन्याने उच्च दर्जाच्या काही नौका लडाख येथे तैनात केल्या होत्या. त्यामुळे ९२८बी प्रकारच्या वजनदार चीनी नौकांचा सामना करणे शक्य झाले होते. पँगाँग त्सो हा तलाव दोन्ही देशांच्या सीमेवर येतो. मागिल आठ महिने या तलावाच्या परिसरात भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य सीमारेषेच्या मुद्द्यावरून आमनेसामने आले आहेत. भारतीय सैन्य जैसे थे परिस्थिती ठेवू इच्छित आहे, तर चीनी सैन्य भारतीय सैन्याने सर्वात आधी या भागातून बाहेर पडावे या मागणीवर ठाम आहे.